|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » सलग तिसऱया दिवशी शेअरबाजारांची घसरण

सलग तिसऱया दिवशी शेअरबाजारांची घसरण 

आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि उदास वातावरणाचा परिणाम  

वृत्तसंस्था / मुंबई

नव्या आठवडय़ाचा प्रारंभ पुन्हा एकदा निराशाजनक झाला आहे. सलग तिसऱया दिवशी मुंबई आणि राष्ट्रीय शेअरबाजारांच्या निर्देशांकांमध्ये घसरण झाली आहे. दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 181.25 अंकांनी घसरून 34,134.38 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 58.30 अंकांनी घसरून दिवसअखेर 10,245.25 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही घसरण दिसून आली.

खरेतर दिवसाचा प्रारंभ तेजीने झाला होता. सेन्सेक्स 321 अंकांनी वर आला होता. तथापि, हे सुरवातीचे उत्साहवर्धक वातावरण दिवसअखेर पूर्णपणे बदलले. शेवटच्या एका तासात विक्रीवाल्यांची सरशी झाली. त्यामुळे प्रारंभी झालेला सर्व लाभ विरून जाऊन निर्देशांक परत खाली आला.

वित्त बाजारात सध्या रोख रकमेचा काही प्रमाणात तुटवटा आहे. त्यामुळे समभाग विकून रोख रक्कम मिळविली जात आहे. रिझर्व्ह बँकेने ही स्थिती बदलण्यासाठी अनेक पावले उचलून सुद्धा त्याचे परिणाम दिसून आलेले नाहीत, असे मत अनेक दलालांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्येही सोमवारी अशीच स्थिती होती. प्रारंभीचा उत्साह नंतर मावळल्याचे दिसून आले. डॉलर आजही चढाच राहिला. याचाही परिणाम दिसून आला.

सोमवारच्या व्यवहारांमध्ये सर्वाधिक फटका इंडसइंड बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला. त्यांच्या समभागांच्या किमतीत अनुक्रमे 8.52 टक्के आणि 3.56 टक्के घट झाली. येस बँक, कोटक बँक, ओएनजीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, स्टेट बँक, अदानी ग्रूप, सन फार्मा, लार्सन अँड टुब्रो आणि आयटीसी या कंपन्यांचे समभागही स्वस्त झाले.