|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणातील बौद्ध समाजात संभ्रमावस्था कायमचिपळुणातील बौद्ध समाजात संभ्रमावस्था कायम 

voting machine copy

चिपळूण / प्रतिनिधी

येथील आरपीआय व भारिप बहुजन महासंघाने महायुतीला, रिपब्लिकन समन्वय समितीने आघाडीला पाठिंबा दिला असून रिपब्लिकन सेनेने तर ना पसंतीचे बटण दाबण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या सर्वांच्या वेगवेगळय़ा भूमिकेमुळे नेमके मतदान करायचे कोणाला, असा प्रश्न बौद्ध समाजाला पडला असून या समाजामध्ये संभ्रमावस्था कायम आहे.

बौद्ध समाजासाठी येथे गेल्या अनेक वर्षांपासून बौद्धजन पंचायत समिती, बौद्धजन हितसंरक्षक समिती, बौद्ध महासभा आदी धार्मिक संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे बहुतांशी समाज या संघटनांना बांधिल आहे. मात्र या संघटना आपल्या धार्मिक कार्याव्यतिरिक्त राजकारणात भाग घेत नसल्याने केवळ निवडणुका आल्या की वरील सर्व पक्ष सक्रिय होतात. मात्र बौद्ध समाजाच्या वाडय़ा या आपल्या स्तरावर नेहमीच निवडणुकांमध्ये निर्णय घेत असतात. तरीही काही पदाधिकारी आपापल्या पातळीवर मोठय़ा पक्षांशी हातमिळवणी करतात. असाच प्रकार या लोकसभा निवडणुकीत दिसून येत आहे.

आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीत सहभाग घेतला असून महायुतीच्याच उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार येथील आरपीआय महायुतीच्या कामाला लागली आहे. एकीकडे त्यांचा प्रचार सुरू असतानाच आता भारिप बहुजन महासंघानेही महायुतीला पाठिंबा दिला असून त्यांनीही आपल्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या या भूमिकेचे महायुतीच्या नेत्यांबरोबरच आरपीआयचे राज्यपातळीवरील कार्यकर्ते गोविंद मोहिते यांनी स्वागत केले असून या सर्वांनी महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांना मोठय़ा फरकाने निवडून आणण्याचा चंग बांधून तशी प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरूवात केली आहे.

असे असतानाच दुसरीकडे मात्र आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष राजू जाधव, माजी समाजकल्याण समिती सभापती मनोहर मोहिते आदींच्या आरपीआय समन्वय समितीने आघाडीला पाठिंबा दिला असून नीलेश राणे यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे, तर बौद्ध समाजातच कार्यरत असलेल्या रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र कदम यांनी या निवडणुकीत नापसंतीचे बटण दाबून बौद्ध समाजाने आपली ताकद दाखवावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे या सर्वांच्या वेगवेगळय़ा भूमिकेमुळे बौद्ध समाजात संभ्रमावस्था निर्माण झाली असून प्रत्येक गावातील वाडय़ा आपापल्या पातळीवर थेट मुख्य पक्षांच्या प्रमुखांशी संपर्क साधून निर्णय घेत असल्याचे वृत्त आहे.

Related posts: