|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अस्थाना यांना तात्पुरता दिलासा

अस्थाना यांना तात्पुरता दिलासा 

सीबीआयमधील गृहयुद्धावर न्यायालयाचा आदेश

 नवी दिल्ली / वृत्तसंस्था

29 ऑक्टोबरपर्यंत सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. अस्थाना यांच्यावर 3 कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सीबीआयच्याच एका अधिकाऱयाला अटक करण्यात आली आहे.

या लाच प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे सुरक्षित ठेवावेत असा आदेशही न्यायालयाने अस्थाना यांना दिला आहे. अस्थाना यांना अटक करण्याची सीबीआयची योजना होती. यासाठी सीबीआयने एक दिवसाचा वेळ न्यायालयाकडे मागितला होता. तथापि, हा वेळ देण्यात आलेला नाही. उलट येत्या सोमवारपर्यंत कोणतीही कारवाई करून नये असा आदेश देण्यात आला आहे.

आपल्या विरोधातील कारवाईसंबंधात अस्थाना यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन संरक्षण मागितले होते. याच याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. आपल्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल सादर करण्यात येऊ नये. तसेच कोणतीही पोलीस कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती.

अंतर्गत कलह उघडय़ावर

सीबीआयने आपलेच एक अधिकारी देवेंदर कुमार यांच्यावर धाड टाकून त्यांना अटक केली होती. या अटकेचा संबंध अस्थाना यांच्यावरील आरोपांशी आहे. त्यामुळे ही अटक महत्वाची मानण्यात येत आहे. या प्रकरणामुळे सीबीआय मधील अंतर्गत वाद उघडय़ावर आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही ज्येष्ठ अधिकाऱयांना आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांच्याशी चर्चा केली होती. पंतप्रधानांनी त्यांना आपल्या निवासस्थानी बोलाविल्याच्या घटनेचा काँगेसने निषेध केला होता.

एकमेकांवर आरोप

सीबीआय प्रमुख अलोककुमार वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्यामुळे सीबीआयची कोंडी झाली आहे. आता हे प्रकरण न्यायालयात गेल्याने न्यायालयाच्या आदेशाकडे साऱयांचे उत्सुकतेने लक्ष आहे.