|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इस्रायलसोबत भारताचा संरक्षण करार

इस्रायलसोबत भारताचा संरक्षण करार 

क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेची होणार खरेदी : इस्रायलच्या कंपनीकडून व्यवहाराची घोषणा

वृत्तसंस्था/  तेल अवीव

 रशियासोबत एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेच्या व्यवहारानंतर भारताने इस्रायलच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेसाठी महत्त्वाचा करार केला आहे. इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजला (आयएआय) 777 दशलक्ष डॉलर्सचे अतिरिक्त कंत्राट मिळाले असून यांतर्गत इस्रायलची कंपनी भारतीय नौदलाच्या 7 नौकांना एलआरएसएएम हवाई तसेच क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणांचा पुरवठा करणार आहे. इस्रायलच्या कंपनीने बुधवारी याबद्दल घोषणा केली आहे.

भारतातील सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) सोबत हा करार प्राप्त केल्याचे आयएआयकडून सांगण्यात आले. एलआरएसएएम (बराक 8 चा भाग) हवाई आणि क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा असून याचा वापर इस्रायल तसेच भारताच्या नौदलासह वायू आणि सैन्यदलाकडून केला जातो. या व्यवहारासोबतच बराक 8 ची विक्री मागील काही वर्षांमध्ये 6 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचे कंपनीने सांगितले.

भारतासोबत भागीदारी

भारतासोबत आमची भागीदारी अनेक वर्षे जुनी असून आता आम्ही संयुक्तपणे यंत्रणेचा विकास आणि निर्मितीकरता काम करत आहोत. भारत आयएआयसाठी मोठी बाजारपेठ असून वाढती प्रतिस्पर्धा पाहता तेथील आमचे स्थान आणखीन दृढ करण्याच्या दिशेने काम करत असल्याचे विधान आयएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमरद शेफर यांनी केले.

संयुक्त प्रकल्प

अमेरिका आणि जुना सहकारी रशियासोबत इस्रायल भारतासाठी शस्त्रास्त्रांचा महत्त्वाचा पुरवठादार म्हणून उदयास आला आहे. मागील वर्षी आयएआयने भारतीय सैन्य आणि नौदलाला क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणांचा पुरवठा करण्यासाठी सुमारे 2 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. बराक क्षेपणास्त्र यंत्रणा इस्रायलचे संरक्षण मंत्रालय, डीआरडीओ, दोन्ही देशांचे नौदल तसेच अनेक अन्य कंपन्यांनी मिळून विकसित केली आहे.