|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मेघश्याम राऊत यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवेश

मेघश्याम राऊत यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवेश 

 

प्रतिनिधी/ पणजी

डिचोली मतदारसंघातील एक व्यावसायिक व समाज कार्यकर्ते मेघश्याम राऊत यांनी काल आपल्या समर्थकासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते बाबु कवळेकर यांनी आमदार निळकंठ हळर्णकर व अन्य पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत केले.

मेघश्याम राऊत यांनी आपल्या सुमारे दोनशे कार्यकर्त्यांसह काल काँग्रेस पक्षात  रीतसर प्रवेश केला. काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांचे स्वागत करण्यात आले. महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांसह त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मागील काही महिन्यापासून डिचोली मतदारसंघातून योग्य असा चेहरा पुढे आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे राऊत यांच्यासोबत पक्षिय नेत्यांची चर्चा सुरू होती.

भाजप हा अंबानी व उद्योजकांचा पक्ष

भाजप हा अंबानी व बडय़ा उद्योगांचा पक्ष आहे. तर काँग्रेस हा गोर-गरिबांचा पक्ष आहे असे विचार यावेळी मेघश्याम कामत यांनी व्यक्त केले. काँग्रेस हा गोरगरिबांचा कळवळा असलेला पक्ष आहे. काँग्रेसला तळागाळातील जनतेबद्दल आत्मीयता आहे. मात्र भाजपला बडय़ा उद्योजकांची काळजी आहे. लोकांची नाही. आज राज्यात मोठमोठे पुल उभारले जातात. विकासाचा डंका वाजविला जातो. मात्र सर्वसामान्य जनतेची काळजी सरकारला नाही. आपण समाजकार्य करीत आलो आहे. आज काँग्रेस पक्षात आल्यामुळे हे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल असेही ते म्हणाले.

यावेळी विरोधी पक्षनेते बाबु कवळेकर यांनीही डिचोली मतदारसंघात यानंतर काँग्रेस सक्षम होणार असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस आज जनतेसोबत आहे. सरकारला जनतेचे काहीही पडलेले  नाही असा आरोपही त्यांनी केला.

लोक वळतायत काँग्रेसकडे

आता हळूहळू लोक काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहेत. भाजपच्या कारभाराला लोक कंटाळले आहेत हे यातून स्पष्ट होत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले. गोव्याच्या संदर्भात आणि गोव्यातील जनतेच्या बाबतीत सरकार पूर्णपणे बेफिकीर आहे. लोकांना भेडसावणारी एकही समस्या सरकारला सोडवता आलेली नाही. त्यामुळे लोक आता काँग्रेसकडे आकर्षित होत आहेत, असेही ते म्हणाले.

Related posts: