|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शशी थरूर यांच्या टिप्पणीवर भाजप संतप्त

शशी थरूर यांच्या टिप्पणीवर भाजप संतप्त 

‘मोदी म्हणजे पिंडीवरचा विंचू’ असा वादग्रस्त उल्लेख : राहुल गांधी यांनी मागावी माफी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस नेते शशी थरूर हे वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱया मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. ‘द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर’ या नव्या पुस्तकावरून चर्चेत असलेले थरूर यांनी याच संदर्भात एक वादग्रस्त टिप्पणी केली आहे. थरूर यांनी एका पत्रकाराचा पुस्तकात उल्लेख केला आहे. या पत्रकाराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंडीवरील विंचवाप्रमाणे असल्याचे सांगितल्याचा दावा थरूर यांनी केला आहे. थरूर यांच्या या  टिप्पणीवर भाजपने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून माफीची मागणी केली आहे.

स्वतःला ‘शिवभक्त’ म्हणवून घेणाऱया राहुल गांधी यांनी थरूर यांच्या विधानाबद्दल माफी मागावी. एकीकडे राहुल स्वतःला शिवभक्त म्हणवून घेतात, तर दुसरीकडे त्यांचे नेते चप्पलाने हल्ल्याचा उल्लेख करून एकप्रकारे शिवलिंगाचे पावित्र्य आणि भगवान महादेवाचा अपमान करत असल्याचे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रवेशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

थरूर यांनी काय म्हटले?

स्वतःचे लेखन आणि पुस्तकांबद्दल बेंगळूर साहित्य महोत्सवात भाग घेण्यासाठी पोहोचलेल्या थरूर यांनी स्वतःच्या पुस्तकातील काही पानांचे वाचन केले. संघातील एका सूत्राने असाधारण रुपकाचा उल्लेख एका पत्रकारासमोर केला होता. मी त्याचा संदर्भ माझ्या पुस्तकात दिला आहे. मोदी हे पिंडीवरचे असे विंचू आहेत, ज्याला तुम्ही हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारूही शकत नाही, अशी टिप्पणी थरूर यांनी केली होती.

‘हिंदू पाकिस्तान’वरून वाद

2019 मध्ये भाजप विजयी झाल्यास भारत ‘हिंदू पाकिस्तान’ होईल असे वादग्रस्त विधान थरूर यांनी ऑगस्ट महिन्यात केले होते. भाजप नवी राज्यघटना लिहिणार असल्याने भारत पाकिस्तानसारख्या देशात परिवर्तित होईल, मग देशात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा कोणताही सन्मान होणार नाही असे त्यांनी म्हटले होते. एक चांगला हिंदू अयोध्येत राम मंदिर इच्छित नसल्याचे अत्यंत वादग्रस्त विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.