|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘संविधाना’मुळेच देश प्रगतिपथावर

‘संविधाना’मुळेच देश प्रगतिपथावर 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

भारतात अंधश्रध्दा व वैज्ञानिक दृष्टीकोनातून जगणारे दोन प्रवाह आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रवाहात वैचारिक मतभेद दिसतात. पण भारत देश संविधानावर चालतो. भारताचे संविधानामुळेच देश प्रगतीपथावर आहे, असे मत डॉ. डी. श्रीकांत यांनी व्यक्त केले.

निर्मिती विचारमंचच्या वतीने ‘भारतीय संविधान महापरीक्षा स्वागत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेखान शाणेदिवाण, भदंत एस. संबोधी, भदंत आर. आनंद, शिवाजी विद्यापीठातील विधी विभागाचे डॉ. विवेक धुपदाळे, प्रा. करूणा मिणचेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. डी. श्रीकांत यांच्या हस्ते कबीर नाईकनवरे व राजवैभव कांबळे यांना संविधान सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. श्रीकांत म्हणाले, मानवाने आपल्या बुध्दीच्या जोरावर संशोधन करून विविध शोध लावले. परिणामी विज्ञानवादी दृष्टीकोन आत्मसात केल्यानेच, मनुष्याची प्रगती झाली आहे. देशाचे संविधान प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. देशाचे वातावरण सध्या गढूळ झाले आहे, त्यामुळे संविधानाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. म्हणूनच या परीक्षेचे नियोजन केले आहे. प्राचार्य डॉ. शाणेदिवाण म्हणाले, ‘भारतीय संविधान महापरीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा संविधानाचा अभ्यास होईल. तसेच लहानपणापासूनच संविधानानुसार जगण्याची सवय लागेल. संविधान महापरीक्षा हा उपक्रम आदर्शवादी आहे. यावेळी अनिल म्हमाने, अमोल महापुरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.