|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अस्नोडा,डिचोलीतील 400 घरे धोक्यात

अस्नोडा,डिचोलीतील 400 घरे धोक्यात 

महामार्ग रुंदीकरणासाठी भूसंपादन चारशे घरांसह मोकळय़ा जागांवरही गदा

प्रतिनिधी/ पणजी

अस्नोडा ते डिचोलीपर्यंत महामार्गाच्या रुंदीकरणासाठी जमीन संपादनाची अंतिम नोटीस हातात आल्यामुळे या भागातील नागरिकांची झोप उडाली आहे. या जमीन संपादन प्रक्रियेमुळे सुमारे 400 घरांना धोका निर्माण झाला आहे. लोकांची फसवणूक करून ही जमीन सरकारने संपादन केल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भूसंपादन अधिकाऱयांकडून या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 31 ऑक्टोबर रोजी ही जमीन ताब्यात घेतली जाणार असल्याचे सूचित केल्यामुळे बाधा पोहोचत असलेल्या लोकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. दोन दिवस अगोदर नोटिसा हातात पडल्याने आपली घरे कशी वाचवावी आणि संसार कसे वाचवावे हा मोठा प्रश्न या लोकांसमोर निर्माण झाला आहे.

बुधवारी उपस्थित राहण्याचा आदेश

अस्नोडा ते डिचोलीपर्यंतच्या महामार्ग रुंदीकरणासाठी ही जमीन ताब्यात घेतल्यास सुमारे 400 घरांना धोका आहे. त्यामुळे 400 कुटुंबांचे संसार उघडय़ावर पडण्याची शक्यता आहे. अचानकपणे अंतिम नोटिसा हाती आल्याने या लोकांचे धाबे दणाणले आहेत. आता अंतिमक्षणी आपली घरे आणि संसार कसे वाचवावे हा मोठा प्रश्न या लोकांसमोर आहे. या संबंधितांनी 31 ऑक्टोबर रोजी डिचोलीतील भूसंपादन अधिकाऱयांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पर्रीकरांनी दिले होते भूसंपादन न करण्याचे आश्वास

या महामार्गासाठी 2014 मध्ये जमीन संपादन प्रक्रिया सुरू झाली होती. त्यावेळी संबंधितांनी या भूसंपादनाला विरोध केला होता. तत्कालीन संरक्षणमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यावेळी या लोकांना ही जमीन संपादन केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. पर्रीकरांनी दिलेल्या आश्वासनावर विसंबून लोक गप्प राहिले, पण आता अचानकपणे भूसंपादनाची अंतिम नोटिसच हाती आल्याने लोक बिथरले आहेत.

या भूसंपादनामुळे अस्नोडा पूल ते मुळगाव, व्हाळशी, बोर्डे, डिचोली या भागातील 400 घरांना धोका निर्माण झाला आहे. या घरासह काही जणांची कुंपणे तसेच मोकळय़ा जागाही जाणार आहेत. अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने या लोकांवर मोठे संकट आले आहे.

आपल्यालाही मोठा धक्का बसला : सावळ

महामार्गासाठी जमीन संपादनाच्या अंतिम नोटिसा पाहून आपल्यालाही धक्काच बसल्याचे माजी आमदार नरेश सावळ यांनी स्पष्ट केले. 31 ऑक्टोबरची अंतिम मुदत असल्याने या लोकांनी सावळ यांच्यापाशी धाव घेतली आहे. या प्रकरणी आपण सोमवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे सावळ यांनी सांगितले. या लोकांच्या भवितव्याचा प्रश्न असून हा अत्यंत गंभीर विषय असल्याचेही ते म्हणाले.

Related posts: