|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » शिक्षकांची भरती होणार, सरकार 4,738 जागा भरणार

शिक्षकांची भरती होणार, सरकार 4,738 जागा भरणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

विद्यापीठे व महाविद्यालयीनशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱयांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकार ‍शिक्षक व शिक्षकेत्तर भरती करणार असून आता महाविद्यालयांना सदरील जागा भरण्याची अनुमती दिली जाईल. विशेष म्हणजे एक पैसाही न देता शिक्षकांची भरती व्हावी, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. तसेच, तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्येही वाढ करण्यात आल्याचे, तावडे यांनी स्पष्ट केले.

 

राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे पदे रिक्त असल्याबाबतची चर्चा सर्वदूर सुरू होती. त्यामुळे होणारे विध्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता केवळ तासिका तत्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल. अध्यापकांच्या 3,580 जागा, शारिरीक शिक्षण संचालनालयातील 139 जागा, ग्रंथपालांच्या 163 जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या 856 जागा अशी एकूण 4,738 पदे येत्या काळात भरण्यात येतील असेही तावडे यांनी सांगितले. तसेच, तासिका तत्वावरील बहुतांश अध्यापकांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून त्यामध्येही घसघशीत वाढ केली आहे. महाविद्यालय व विद्यापीठातील ही पदभरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.