|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » ‘ग्लोबल पुलोत्सव’ 17 नोव्हेंबरपासून रंगणार

‘ग्लोबल पुलोत्सव’ 17 नोव्हेंबरपासून रंगणार 

पुणे / प्रतिनिधी :

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार असून, गेल्या 14 वर्षांपासून साजरा होणारा पुलोत्सव यंदा 17 ते 25 नोव्हेंबरदरम्यान अधिक दिमाखदार स्वरूपात सादर होणार असल्याची माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांनी शुक्रवारी दिली.

‘पु. ल. परिवार’, ‘आशय सांस्कृतिक’ यांच्या वतीने व ‘स्क्वेअर-1’च्या सहय़ोगाने हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी सतीश जकातदार, ‘स्क्वेअर-1’चे नयनीश देशपांडे, मयूर वैद्य, सी. एम. डी. पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे आदी उपस्थित होते.

गुरूवारी 8 नोव्हेंबरला सकाळी 11 ते 1 वा. पु. लं.च्या निवासस्थानी छोटेखानी मेळावा भरविण्यात येणार असून, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वा. बालगंधर्व रंगमंदिरात महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते नव्या लोगोचे अनावरण होणार आहे. त्यानंतर पुलोत्सवावर आधारित लघुपटाचा मुहूर्त ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते होणार आहे. 92 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांची विशेष उपस्थिती राहणार असून, त्यांचा जाहीर सत्कारही करण्यात येणार आहे. तसेच पु. ल. कुटुंबीयांच्यावतीने जतन केलेल्या पुलंच्या दुर्मीळ भाषणांवर आधारित 75 मिनिटांच्या लघुपटाचा ‘प्रिमियर’ ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हा कार्यक्रम होणार आहे.

त्याचबरोबर 17 ते 25 नोव्हेंबरपर्यंत होणाऱया महोत्सवाचे उद्घाटन 17 रोजी बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्व कलादालन, अर्काइव्ह थिएटर व म. सा. प. सभागृह येथे होणार आहे. हा महोत्सव ‘सबकुछ पु. ल.’ असा असून, त्यात 100 हून अधिक दिग्गज कलाकार सहभागी होतील. ग्लोबल पुलोत्सवात सुमारे 50 हुन अधिक कार्यक्रम होणार असून त्यातील जवळपास 30 कार्यक्रम रसिकांना विनामूल्य पहावयास मिळतील व उर्वरित काही कार्यक्रमांना नाममात्र तीकिट आकारले जाणार आहे.

विकास आमटे यांना पु. . कृतज्ञता सन्मान

पुलप्रेमींसाठी ‘आठवणीतले पु.ल.’ या आगळय़ावेगळया संचाची निर्मितीही करण्यात आली आहे. तसेच सिझन तिकीट विक्री रविवारी 11 नोव्हेंबरला सकाळी 9 ते 12 व सायंकाळी 5 ते रात्री 8 वा. बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरू होईल. त्याचबरोबर पुलंच्या नावाचा ‘कृतज्ञता सन्मान’ डॉ. विकास आमटे यांना, तर ‘तरूणाई सन्मान’ कौशिक चक्रवर्ती यांना या वेळी जाहीर करण्यात आला.

छायाचित्रांतून पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध

दरम्यान, संवाद, संस्कृती प्रतिष्ठान व साहित्य वेध प्रतिष्ठानच्या वतीने पु. ल. देशपांडे जन्मशताब्दीनिमित्त 7 ते 9 नोव्हेंबरपर्यंत पु.लं.च्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारे छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी सकाळी 11 वा. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस व प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित असतील. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असल्याचे साहित्यवेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे यांनी सांगितले. तर गुरुवारी 8 ला पहाटे 6 वा. पु. ल. यांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘आनंदयात्रा’ हा कार्यक्रम होईल. तसेच नाटय़गृहाच्या पडद्यामागील कलाकारांचा सत्कार प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री देविका दप्तरदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.