|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पुस्तकेच झाली हवालदिल

पुस्तकेच झाली हवालदिल 

ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी काय प्रयत्न करता येतील असा विचार करण्याची गरज आहे. अभिजात साहित्याचा आग्रह धरणाऱया वाचकांनी एकत्र येत ही ज्ञानमंदिरे आपल्या ताब्यात घेण्यासाठी एक सकारात्मक राजकारण खेळण्याची गरज आहे!

 

मागील आठवडय़ात वाचन संस्कृतीला धक्का बसेल अशा तीन घटना घडल्या. साहित्याचे ज्येष्ठ रसिक अण्णा शिरगांवकर (दाभोळे) यांनी आपले ऐतिहासिक ग्रंथ संचित विकणे आहे अशी जाहिरात दिली तर लोहगाव येथील अंजली जैन यांनी तीस हजार पुस्तके असलेले सुसज्ज ग्रंथालय बंद करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर आपल्या कवितेच्या माध्यमातून मराठी भाषा जागतिक स्तरावर पोचवणाऱया एका दिवंगत कवीच्या घरातील समृद्ध ग्रंथालयातील मराठी, इंग्रजी ग्रंथ संपदा फुकट नेण्याचाही त्रास कुणी मराठी कवी-लेखक घ्यायला तयार नसल्याची खंत त्या कवीच्या पत्नीने व्यक्त केली. या सगळय़ावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे ती म्हणजे वाचक संख्याच कमी होत जात असल्याने आता पुस्तकेच हवालदिल झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रश्न असा पडतो की खरंच चांगल्या वाचनसंस्कृतीसाठी आज तशा प्रकारचा भवताल निर्माण केला जातो आहे का, याचा आपण वाचन प्रेमी म्हणून अधिक सखोल, सजगपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाचन असो किंवा कोणतीही गोष्ट निक्वळ विचारांच्या पातळीवर स्वीकारायची असेल तर तसा भवताल असणे किंवा तो निर्माण करणे हे अतिशय गरजेचे असते. मराठी वाचन संस्कृतीचा एकूण इतिहास पाहता समाजाच्या सर्व स्तरात वाचनाचा असा जाणून-बुजून भवताल निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला गेला आहे, असे काही दिसत नाही.त्यामुळेच वाचन संस्कृतीबाबतची ही उदासीनता दिसून येत आहे.त्यामुळे आजही एखाद्या मोठय़ा कुटुंबात अपवादात्मक नव्या पिढीतून एखादा वाङ्मयीन लेखन लिहू लागतो किंवा वाचनसंस्कृतीशी जोडून घेऊ पाहतो तेव्हा समाजाच्या इतर स्तरातून सोडून द्या खुद्द त्यांच्या घरातूनच त्याला या सगळय़ाच्या विरोधाला सामोरे जावे लागते. यासाठी आता वाचन संस्कृतीकडे जाण्यासाठी आधी विचाराच्या पातळीवर परस्पर संवाद वाढवीत जाणे ही गोष्ट सतत होत राहिली पाहिजे. म्हणजे जी मुले शिकलेली आहेत, ज्याना किमान दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी घडत आहेत त्याबद्दल उत्सुकता आहे अशांचा एक गट निर्माण करता येऊ शकतो. असे काही गट एखाद्या भागात तयार झाले तर आठवडय़ातून, पंधरा दिवसातून, महिनाभरात एकत्र येऊन आजूबाजूच्या घडणाऱया घटनांबद्दल चर्चा करता येते. त्या घटनांवर माध्यमात कसे विश्लेषण केले गेले आहे, याबद्दल त्या घटनेच्या मुळाशी जाऊन सविस्तर त्या गटामध्ये साधक बाधक विचार मांडले जाऊ शकतात.यातून आजूबाजूला घडणाऱऱया बऱया वाईट घटनांबद्दलची त्यांच्यात जाणीव निर्माण केली जाऊ शकते.यातून तो गट पुस्तकाकडे आणि त्यातही तशा गंभीर घटनांवर लिहिल्या गेलेल्या ग्रंथाकडे वळविणे शक्मय होईल. जी जी ज्ञानसाधने आहेत ती वाचनसंस्कृतीला पूरक ठरतात.मात्र आज अशा ज्ञानसाधनांमध्ये वाचनसंस्कृतीबद्दल कमालीची उदासीनता दिसून येते आणि याबद्दल तिथल्या जबाबदार लोकांना ना खेद ना खंत अशी सगळी बिकट परिस्थिती आहे. अगदी उदाहरण घ्यायचे म्हटल्यास याबाबत आपल्याला शाळा, माध्यमिक विद्यालये-महाविद्यालये यांचा विचार करता येऊ शकतो. शैक्षणिक वाटचालीत वाचन संस्कृती विद्यार्थी जोडला गेला तर तो चांगला विचार करू शकतो. एवढेच काय समाजातील काय वाईट, काय चांगले हे ठरविण्याची त्याची मानसिकता याच काळात घडू शकते. परंतु असा विचार आताच्या या शैक्षणिक पातळय़ांवर होताना दिसत नाही. काही महाविद्यालयांमध्ये तर वाङ्मय मंडळाची स्थापनाही होत नाही. याचे दुसरे तिसरे काहीच कारण नाही तर खुद्द मराठी विषयाच्या प्राध्यापकांची आपल्याच मातृभाषेद्दलची आणि त्या भाषेतील साहित्याबद्दलची उदासीनता. संस्थाचालकांना तर असे कार्यक्रम करणे म्हणजे आपल्याच छुप्या गोष्टी या निमित्ताने बाहेर पडतील आणि विद्यार्थीच आपल्याला प्रश्न विचारतील असे वाटत राहते आणि काही प्राचार्य तर संस्थाचालकांच्या ताटाखालचे मांजर झाल्यामुळे त्यांना याबद्दल तर आस्थाच नाही. ज्या महाविद्यालयात साहित्याचा विषय घेऊन मुले पदवीधर होण्याची स्वप्ने पाहतात त्याच महाविद्यालयात साहित्यविषयक उपक्रम विशेष गांभीर्यपूर्वक  राबवले जावू नयेत हे वाईट आहे. तर माध्यमिक आणि प्राथमिक शाळेच्या पातळीवर अपवाद वगळता वाचन संस्कृतीसाठी फार काही होत नाही. यामुळे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्व शाळा महाविद्यालयांनी वाचन कट्टा चालविणे, शाळांसाठी सुरू करण्यात आलेल्या किशोर मासिकाचे मुलांकडून निय्ग्नामित वाचन करू घेणे, मुलांनी वाचलेल्या ग्रंथावर वक्तृत्व स्पर्धां घेणे, शिक्षक-प्राध्यापकांनी स्वतः वाचलेल्या ग्रंथावर विद्यार्थांशी चर्चा करणे आणि ते ग्रंथ मुलांना वाचायला देणे असे उपक्रम राबविणे शक्य आहे.वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी ग्रंथालय हा  महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतु आज अशी परिस्थिती आहे की वाचन संस्कृतीचा अडथळा ग्रंथालयेच ठरण्याची जास्त शक्मयता आहे.अनुदान लाटण्यासाठी ग्रंथालयांची गावोगाव निर्मिती करण्यात येत आहे का? अशी परिस्थिती सार्वत्रिक दिसते आहे. ज्या ग्रंथालयांनी ग्रंथालयात नवनवीन उत्तमोत्तम पुस्तके ठेवावीत त्या जागी किलोने विक्रीस उपलब्ध असणारी पुस्तके ठेवली जात आहेत. (अर्थात काही अपवादात्मक ग्रंथालये चांगले काम करत आहेत) ग्रंथालयात चांगली पुस्तके येण्यासाठी ग्रंथपाल अभ्यासू पाहिजे. अलीकडल्या काळात काही ग्रंथालयांवर साहित्यप्रेमी किंवा साहित्यिक यांची वर्णी न लागता राजकीय व्यक्तीनी ग्रंथालये ताब्यात घेतलेली दिसतात. यामागे ग्रंथालयाची भरभराट व्हावी असा त्यांचा अजिबात हेतू नसतो तर आपल्या शहरातील अनेक संस्था आपल्या ताब्यात असाव्यात हाच स्वार्थ असतो. त्यामुळे पुस्तके त्यांनी वाचणे ही खूप दूरची गोष्ट, पण अगदी चार पुस्तकांची नावे सांगा असे जरी विचारले तरी त्यांना काही सांगता येणार नाही. मग अशा व्यक्तींच्या अधिकारात ग्रंथालये असतील तर वाचनसंस्कृतीला ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून कसे काय बळ मिळेल? दुसऱया बाजूला अनेक ग्रंथालयांवर असणारे पदाधिकारी हे त्या त्या शहरातील स्थानिक पातळीवर लुडबुड करणारे कार्यकर्ते असतात. त्यामुळे चांगली ग्रंथनिवड तर सोडूनच द्या परंतु वर्षभराचे साहित्यिक उपक्रम ग्रंथालयामार्फत राबवले जातात तो  एक हौशीचाच मामला असतो. या पार्श्वभूमीवर ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी काय प्रयत्न करता येतील असा विचार करण्याची पुन्हा नव्याने गरज निर्माण झाली आहे. जिथून ज्ञान विस्तारायला हवे, माणसाच्या मेंदूत त्यामुळे बदल घडायला हवा, मेंदूने एक रेषीय विचार करू नये तीच ग्रंथालयासारखी ज्ञान मंदिरे या अवस्थेतून जात असतील तर आता त्या त्या शहरातील अभिजात साहित्याचा आग्रह धरणाऱया दोन-चार का असेना पण अशा वाचकांनी एकत्र येत ही ज्ञानमंदिरे आपल्या ताब्यात घेण्यासाठी एक सकारात्मक राजकारण खेळण्याची कधी नव्हे एवढी आज गरज निर्माण झाली आहे!

अजय कांडर