|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बंदरजेटी वादावर पडदा

बंदरजेटी वादावर पडदा 

जाहीर माफीनाम्यावर प्रकरण मिटले

प्रतिनिधी / मालवण:

 बंदरजेटीवर स्टॉल उभारण्यावरून सतीश आचेरकर आणि वैभव मयेकर यांच्यात निर्माण झालेल्या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यात आला. याप्रकरणी माफी मागितल्यानंतर आणि पुन्हा वादाचे प्रसंग निर्माण न करण्याच्या अटींवर प्रकरणावर पडदा पडला आहे.

 गेले दोन दिवस बंदरजेटीवर झालेल्या वादामुळे शहरात वातावरण तंग बनले होते. हाणामारीच्या घटनांमुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे आचरेकर व मयेकर यांनी याप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार न देता प्रकरण चर्चेतून सोडविण्याचा निर्णय घेतला. यासाठी बाबा परब, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, भाई कासवकर यांनीही पुढाकार घेतला. एकत्रित व्यवसाय करताना वादाचे प्रसंग निर्माण झाल्यास सर्वांनाच त्रासदायक ठरणार असल्याने भविष्यातही कोणतेही वाद न करता व्यवसाय करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

बंदरजेटीवर वाद नकोत!

पोलीस स्टेशनमध्य़े एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ कारवाई केली जाते. बंदरजेटीवरील घटनेवर आम्ही लक्ष ठेवून होतो. मात्र, मारहाणीची अधिकृत तक्रार दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यापूर्वीच वादी आणि प्रतिवादी यांच्यात तोडगा निघाला. आम्ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी याठिकाणी कार्यरत आहोत. भविष्यातही कोणतेही वाद बंदरजेटीवर होऊ नयेत, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, असे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी स्पष्ट केले.