|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » फटाके उडविण्यास दोन तास मुदत

फटाके उडविण्यास दोन तास मुदत 

आनंदावर विरजण : दिवाळी काळात रात्री 8 ते 10 या वेळेत वापर, फटाक्यांच्या लांब माळा विक्री-वापरावर बंदी

प्रतिनिधी/ बेंगळूर

सणासुदीच्या काळात फटाके उडवून आनंद व्यक्त करणाऱयांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने रात्री 8 ते 10 या कालावधीत दोन तास फटापे उडविण्यास परवानगी दिली आहे. तसेच फटाक्यांच्या लांब माळा तयार करणे, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. शनिवारी यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला.

ऐन दिवाळीच्या तोंडावर सरकारने फटाकेप्रेमींची निराशा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यास राज्य सरकार सरसावले आहे. यासंबंधी नवी दिल्लीप्रमाणे कर्नाटकातही मार्गसूची तयार करण्यात आली आहे. त्यानुसार 5 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत रात्री 8 ते 10 या वेळेत केवळ दोन तास फटापे (फायर क्रॉकर्स वगळून) फोडता येतील. अधिकृत परवाना घेतलेल्यांनाच फटाकेविक्री करण्याची मुभा आहे.

वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि फटापे फोडल्यानंतर मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्याने फटक्यांच्या लांबलचक माळा तयार करणे, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच जनतेमध्ये फटाक्यांमुळे होणाऱया दुष्परिणामाविषयी जागृती करण्याची सूचना वार्ता आणि प्रसारण खाते व जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या अगोदर 7 दिवस आणि नंतर 7 दिवस असे एकूण 14 दिवस फटापे उडविण्यासंबंधी पाहणी करून अहवाल सादर करावा. सर्व महानगरपालिका, जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत कार्यकक्षेत सामूहिकपणे फटाके उडविण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण आणावे. बंदी असणाऱया फटाक्यांची विक्री रोखावी, असेही आदेशपत्रकात सरकारने म्हटले आहे.

बंदी असणारे फटापे विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी संबंधित पोलीस स्थानकाच्या अधिकाऱयांनी न्यायलायाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांना दोषी ठरवून कारवाई करावी, असाही उल्लेख आदेशपत्रकात करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रीवर बंदी घातली नसली तरी अनेक अटी लागू केल्या आहेत. ठराविक प्रकारच्या फटक्यांच्या विक्रीवर निर्बंध घातले आहे. तसेच ऑनलाईनवरून फटापे विक्रीला मनाई केली आहे. अधिक प्रमाणात धूर निर्माण होणारे, कानठळय़ा बसणारे फटकेही वापरू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.