|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » मुंबईचा माजी खेळाडू अमेरिकन संघाचा कर्णधार

मुंबईचा माजी खेळाडू अमेरिकन संघाचा कर्णधार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

27 वषीय क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकरसाठी आयुष्याचे वर्तुळ पूर्ण झाले असून मुंबईचा हा माजी मध्यमगती गोलंदाज आता अमेरिकन राष्ट्रीय संघाचा कर्णधार झाला आहे. 2015 मध्ये त्याने कॉर्नेल युनिव्हर्सिटीत कम्प्युटर सायन्सचा अभ्यास करण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण शिक्षण घेत असताना त्याने क्रिकेटची आवड मात्र कायम ठेवली होती.

सहा फूट उंची लाभलेला हा डावखुरा जलद गोलंदाज 2010 मध्ये झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा सदस्य होता आणि त्यानेच भारतातर्फे स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळविले होते. या बळींमध्ये नंतर नावारूपास आलेल्या दोन फलंदाजांचा समावेश होते. ते फलंदाज म्हणजे इंग्लंडचा सध्याचा कर्णधार जो रूट व पाकिस्तानचा सलामीवीर अहमद शेहजाद.. तीन वर्षांनंतर सौरभ मुंबईसाठी एकमेव रणजी सामना खेळला होता. कर्नाटकविरुद्ध झालेल्या त्या सामन्यात त्याने 3 बळी मिळविले होते. मात्र सौरभला आपल्या भवितव्याबाबत खात्री वाटत नव्हती. ‘क्रिकेटसाठी पूर्ण वेळ दोन वर्षे दिली. पण पुढच्या स्तरावर मला संधी मिळत नव्हती,’ असे तो म्हणाला. मुंबई इंजिनियअरिंग केल्यानंतर 2015 मध्ये तो मास्टर्स पदवीसाठी अमेरिकेतील कॉर्नेल युनिव्हर्सिटीत दाखल झाला. तेथेही त्याने आपली आवड जपण्याचा प्रयत्न करताना काही सामने खेळले.  ओरॅकलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून दाखल झाल्यानंतरही त्याने ही आवड कायम राखली आणि यासाठी आठवडाअखेरीस सॅन फ्रान्सिस्को ते लॉस एंजेल्स असा सहा तासांचा प्रवास करीत होता.

‘शुक्रवारी ऑफिसमधून मी थोडा लवकर निघत असे आणि सहकारी खेळाडूसमवेत लॉस एंजेल्स गाठत असेल. शनिवारी 50 षटकांचा सामना खेळायचो आणि शनिवारी रात्री पुन्हा सॅन फ्रान्सिस्कोला प्रयाण करून रविवारी तेथे 50 षटकांचा सामना खेळायचो. सोमवारी नेहमीप्रमाणे ऑफिसला हजर होत असेल. मी कठोर मेहनत घेत असल्याचे निवड समितीच्या लक्षात आले आणि याची दखल घेत त्यांनी गेल्या जानेवारीत राष्ट्रीय संघासाठी निवडण्यास पात्र ठरल्यानंतर माझी निवड केली,’ असे सौरभने सांगितले.

अमेंरिकेत क्रिकेटची लोकप्रियता सध्या बरीच वाढीस लागली असून 48 राज्यांत 400 हून अधिक लीग्समध्ये 6000 संघांचा सहभाग असून सुमारे 2 लाख खेळाडू त्यात खेळत असल्याचे आयसीसीने सांगितले आहे. 22 ते 36 दशलक्ष लोक क्रिकेटमध्ये स्वारस्य दाखविणारे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकन क्रिकेट संघात भारत, विंडीज, पाकिस्तान येथील खेळाडूंचाच जास्त भरणा आहे. महाराष्ट्राचा सुशील नाडकर्णी व हैदराबादचा इब्राहिम खलील यांनी अमेरिका क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले आहे. पुढील आठवडय़ात अमेरिका संघ ओमानमध्ये आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग तृतीय विभागमध्ये खेळणार आहे. 2023 च्या वर्ल्ड कपसाठी ती पात्रता स्पर्धा असणार आहे.