|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बसच्या अपघातात निढळेवाडी येथील युवक ठार

बसच्या अपघातात निढळेवाडी येथील युवक ठार 

वार्ताहर/ संगमेश्वर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या पुनर्वसन येथे रिक्षातून उतरुन रस्ता ओलांडत असताना बसची धडक बसल्याने युवक जागीच ठार झाला. ही घटना रविवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या दरम्यान घडली.

नरेश रोहिदास वाडकर (32, रा. निढळेवाडी ता. संगमेश्वर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. नरेश हा सुतारकाम करण्यात पारंगत होता. नरेश वाडकर हा रविवार असल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत गेला होता. बाजारपेठेत खरेदी करुन तो परत निढळेवाडीकडे निघाला होता. तो परतत असताना पुनर्वसन येथील त्याच्या मित्राने आपल्या घरात वस्तू खरेदी करुन ती पोहोचविण्यास सांगितले होते. निढळेवाडीपासून काही अंतर मागे असलेल्या पुनर्वसन येथे रिक्षा उजव्या बाजूला थांबवून वस्तू पोहोच करण्यासाठी तो निघाला होता. पुनर्वसन येथील महामार्ग ओलांडून तो जवळजवळ पलिकडे पोहोचला होता. याचवेळी रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱया राज्य परिवहन मंडळाच्या बसची धडक बसल्याने नरेश गंभीर जखमी झाला. यात त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली. यानंतर त्याला तत्काळ संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यावेळी हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताचे वृत्त समजताच गावातील नातेवाईक संजय वाडकर यांसह अनेकांनी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 पुनर्वसन येथे झालेल्या अपघातास बसचालक जबाबदार असल्याचा आरोप मृत नरेश वाडकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे. रत्नागिरीहून मुंबईला बस घेवून जाणाऱया चालकाने नरेश वाडकर याला दिलेल्या धडकेमुळे त्याचा मृत्यू झाला. नरेश रस्ता ओलांडून जवळपास गेला होता. डांबरीकरण केलेला रस्ता ओलांडला असताना त्याला बसची धडक कशी लागली, चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.