|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » हुंदके देतच घनवट साहेबांना मारला सॅल्युट

हुंदके देतच घनवट साहेबांना मारला सॅल्युट 

प्रतिनिधी/ सातारा

 माणसं कशी जिंकायची असतात, आपले खबरे कसे तयार करायचे, गुन्हेगारी कशी उखडून काढायची हे सर्व अधिकारी म्हणून करत असताना अधिकाऱयाला माणूसपण जपून आपल्या हाताखालच्या लोकांच्या हृदयात जागा मिळवणेही काही सोपी गोष्ट नाही. ती मात्र पद्माकर घनवट यांनी लिलया साकार केली. म्हणूनच सोमवारी त्यांना निरोप देताना सर्वांना जड जात होते. गुन्हेगारांना धडकी भरवणारे एलसीबीचे पोलीस कर्मचारी मात्र सोमवारी लहान मुलासारखे रडत होते. हे वातावरण पाहून घनवट साहेबसुद्धा हुंदके देऊन रडले येथे कोणीही कर्मचाऱयाने सॅल्युट न करताही प्रत्येकाच्या मनाने मात्र घनवट साहेबांना सॅल्युट मारला.

 शासकीय अधिकारी- कर्मचारी म्हटले की बदली ही ओघाने आलीच. पद्माकर घनवट साहेबांवर आज ही वेळ आली अन् संपूर्ण एलसीबीची टीम धायमोकलून रडली. तसं पहायला गेले तर घनवट साहेबांची तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरच बदली होणार होती. मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांचे काम पाहून त्यांना एक वर्ष वाढीव दिले होते ते वर्षेही संपले व त्यांची पुणे ग्रामीण एलसीबीला बदली झाली. ही बदली होऊन पाच सहा दिवस झाले. परंतु सोमवारी मात्र साहेब चक्क सातारा सोडून चालले होते. त्यामुळे एलसीबीचा एक-एक खंदा निडर बेधडक कारवाईत निपुण असलेला पोलीस कर्मचारी मात्र साहेबांच्या गळ्यात पडून रडत होता. तर कोण पाया पडून रडत होते. महिला पोलीस कर्मचारीही रडल्या. एवढेच काय घनवट साहेबांचे खबरे झिरो पोलीसही भावनिक झाले होते. 

   घनवट साहेबांच्या चार वर्षाच्या कामाची ही पावती होती. माणसातला माणूस, अधिकाऱयातील माणूस म्हणून पोलीस खात्यात त्यांची ओळख होती. अशीच ओळख ते पुणे येथे निर्माण करतील. परंतु तोपर्यंत साताऱयातील तपासाची त्यांनी निर्माण केलेली गती आता राखणे एलसीबीला जड जाणार आहे. त्यासाठी आणखी एखादा चांगला अधिकारी लवकर यावा एवढीच सर्वांची अपेक्षा.

 

Related posts: