|Friday, August 23, 2019
You are here: Home » Top News » देश महासत्ता होत असताना युवकांना सकारात्मक उर्जेची गरज : एअरमार्शल भूषण गोखले

देश महासत्ता होत असताना युवकांना सकारात्मक उर्जेची गरज : एअरमार्शल भूषण गोखले 

ऑनलाईन टीम / पुणे :
 देश महासत्तेकडे वाटचाल करीत असला, तरीही युवा पिढीसमोर अनेक नकारात्मक गोष्टी ठेवल्या जात आहेत. जर ख-या अर्थाने भारताला महासत्ता करायचे असेल, तर युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याची गरज आहे. जेव्हा तरुणाईमध्ये नकारात्मकतेची भावना येईल, तेव्हा समाजातील पाय जमिनीवर ठेऊन काम करणा-या आदर्श लोकांकडे पहावे. देशप्रेम प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असते आणि तीच आपली खरी ताकद आहे, असे प्रतिपादन एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी केले. 
मेडवर्ल्ड-एशिया इंटरनॅशनल पब्लिकेशनच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त कॅम्पमधील हॉटेल अरोरा टॉवरच्या सभागृहात मेअर पुरस्कार आणि युथ आयकॉन पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी, चित्रकार चारुहास पंडित, अभिनेत्री शर्वरी जमेनीस, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू मनिषा बोडस, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मोतिलाल तायडे, पुरस्कार वितरण समितीचे समन्वयक आणि श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलजचे उपअधिष्ठाता डॉ.सचिन वानखेडे आदी उपस्थित होते. 
दंतचिकित्सेतील अहमदाबादचे तज्ज्ञ डॉ.जैमेन पटेल, दंतचिकित्सेचे हरियाणा येथील अभ्यासक डॉ.मनू राठी, पुण्यातील एमडी (मेडिसीन) डॉ.विवेक मनाडे, बंगळुरु येथील डॉ.सुप्रिया मानवी यांना यंदाचा मेअर पुरस्कार २०१८ प्रदान करण्यात आला. तसेच अभिनेता अनिल नगरकर, मिस्टर वर्ल्ड आणि मिस्टर इंडिया पुरस्कार विजेते सुहास खामकर, हिंद केसरी अमोल बराटे, मैत्र-युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संकेत देशपांडे, क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपिस्ट डॉ.सुप्रिया देशमुख यांना युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात देशभरातील ४० हून अधिक वैद्यकीय तज्ज्ञांना देखील गौरविण्यात आले. 
डॉ.न.म.जोशी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात भारतामध्ये मोठया प्रमाणात संशोधन होत नाही, असा अनेकांचा समज आहे. मात्र, मेडवर्ल्ड- एशिया इंटरनॅशनल पब्लिकेशन अंतर्गत असलेल्या तज्ज्ञांनी मोठया प्रमाणात संशोधन केले आहे. सामान्य लोकांसाठी काम करण्यासोबतच संशोधन करण्याची वृत्ती डॉक्टरांमध्ये असते, हे कौतुकास्पद आहे. 
शर्वरी जमेनिस म्हणाल्या, कोणत्याही क्षेत्रात काम करताना रियाज व साधना ही अत्यंत महत्त्वाची असते. सराव हा आपल्याला अचूकतेकडे नेतो. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर्स हे दररोज रुग्णांना सेवा देत अशाच प्रकारचा सराव करतात. त्यामुळे आजारांतून रुग्णांना बरे करणारे डॉक्टर्स हे त्यांच्यासाठी देव असतात, अशा शब्दांत त्यांनी डॉक्टरांच्या कार्याला सलाम केला.