|Friday, August 23, 2019
You are here: Home » Top News » अवनी वाघिणीच्या शिकारीवरून राज यांचा सरकारवर निशाणा

अवनी वाघिणीच्या शिकारीवरून राज यांचा सरकारवर निशाणा 

 

ऑनलाईन टीम / मुंबई ः

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकरणावरुन भाजपा सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. अवनी वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं होतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी अवनी वाघीण शिकार वादात उडी घेतली आहे. फक्त पुतळे उभारुन वाघांचं संवर्धन होऊ शकत नाही. हीच गोष्ट गुजरातमध्ये सिंहांच्या बाबतीत झाली असती तर किती गोंधळ झाला असता, हा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुनगंटीवारांचं मंत्रिपद जाऊ शकतं शिवाय, सुधीर मुनगंटीवार बेफिकीरपणे उत्तरं देतात. ते वनमंत्री आहेत म्हणजे त्यांनी सर्वच समजतं असं नाही. उद्या त्यांचं वनमंत्रिपदही जाऊ शकतं, असे म्हणत राज यांनी मुंनगंटीवारांवर टीका केली.

सरकारवर गंभीर आरोप

ज्या वाघिणीला ठार करण्यात आले, तेथे सरकार अनिल अंबानींना जागा देणार असल्याची चर्चा आहे. अनिल अंबानींसाठी देश विकायला काढलाय, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

भाजपाला सत्तेचा माज

वाघिणीला ठार केल्यानंतर तिचे दोन बछडे अनाथ झाले आहेत. एका जिवाला ठार केल्यानंतर आणखी दोन जिवांना मारल्याचं चित्र आहे. सरकारला सत्तेचा माज आलाय. आम्ही काहीही केलं तरी सगळं सहन केलं जाते, अशी त्यांची मानसिकता बनलीय. पण घोडा मैदान जवळ आहे, त्यामुळे लवकरच कळेल, असा हल्लाबोल त्यांनी भाजपा सरकारवर चढवला आहे.