|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जवानांसोबत दिवाळी, केदारनाथमध्ये पूजा

जवानांसोबत दिवाळी, केदारनाथमध्ये पूजा 

केदारनाथमधील प्रकल्पांचा घेतला आढावा : आयटीबीपी जवानांशी साधला संवाद

वृत्तसंस्था /  केदारनाथ 

उत्तराखंडमध्ये हर्षिल सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी केदारनाथ धाम येथे पोहोचले. पंतप्रधान झाल्यावर ते तिसऱयांदा बाबा केदारचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. जलाभिषेकानंतर त्यांनी विशेष पूजा करत मंदिराला प्रदक्षिणा घातली आहे. यानंतर त्यांनी केदार खोऱयात सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला, यावेळी अधिकाऱयांकडून माहिती घेत पंतप्रधानांनी निर्देश देखील दिले आहेत.

पूजा केल्यानंतर पंतप्रधानांनी नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतरची स्थिती मांडणाऱया छायाचित्रांच्या एका प्रदर्शनाला भेट दिली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंदसिंग रावत यावेळी त्यांच्यासोबत होते. केदारधाम येथे सुमारे 2 तास पंतप्रधान मोदी थांबले होते. केदारनाथमध्ये पंतप्रधानांना पाहता यावे याकरता लोकांनी मोठी गर्दी केली होती. पंतप्रधानांनी हात उंचावून लोकांना अभिवादन केले.

तुमच्यामुळे भारतीयांची स्वप्ने सुरक्षित

सैन्यप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासोबत पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी भारत-चीन सीमेनजीक हर्षिल येथे पोहोचले. तेथे त्यांनी स्वतःच्या हाताने जवानांना मिठाई भरविली आहे. दुर्गम हिमटेकडय़ांवर तुमचे कर्तव्याबद्दलचे समर्पणच पूर्ण देशाला बळ पुरवतो आणि तुमची हीच भावना 125 कोटी भारतीयांची स्वप्ने आणि भविष्य सुरक्षित करत असल्याचे मोदींनी जवानांना उद्देशून म्हटले आहे.

सशस्त्र दलांचे कौतुक

 संरक्षणाच्या क्षेत्रात भारत मोठी पावले उचलत आहे. वन रँक, वन पेन्शन समवेत माजी सैनिकांच्या कल्याणाकरता सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमांबद्दल भारतीय सशस्त्र दलांचे जगभरात कौतुक होत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

दरवर्षी जवानांसोबत दिवाळी

2015 मध्ये दिवाळीवेळी पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमधील सीमा क्षेत्राला भेट दिली होती. त्यांच्या या दौऱयावेळीच 1965 मधील भारत-पाक युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाली होती. 2017 मध्ये पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशातील एका चौकीवर आयटीबीपी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. मागील वर्षी मोदींनी जम्मू-काश्मीरच्या गुरेज येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.