|Saturday, March 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » माजी मंत्री जनार्दन रेड्डी गोत्यात

माजी मंत्री जनार्दन रेड्डी गोत्यात 

प्रतिनिधी / बेंगळूर

नोटाबंदीनंतर बेकायदेशीर व्यवहार आणि 57 किलो सोन्याची बिस्कीटे खरेदी प्रकरणी माजी मंत्री आणि खाण सम्राट गाली जनार्दन रेड्डी यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. बेंगळुरातील सीसीबी पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे. या प्रकरणासंबंधी बुधवारी सकाळी पोलिसांनी  बेंगळूर, मोळकाल्मूर, बळ्ळारी, चित्रदुर्ग येथील जनार्दन रेड्डींच्या मालमत्तांवर छापे टाकून तपासणी केली आहे.

फसवणूक प्रकरणी तपास करून पोलिसांनी अंबिडेंट संस्थेचा मालक सय्यद अहमद फरीद आणि राजमहल फॅन्सी ज्वेलर्सचा मालक रमेश यांना अटक केली आहे. जनार्दन रेड्डी यांचा निकटवर्तीय अलिखानचीही या प्रकरणात महत्वाची भूमिका असल्याने त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी व्यापक जाळे विणले होते. दरम्यान अलिखान याने न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळविला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोप असलेले जनार्दन रेड्डी तेलंगणामध्ये फरार झाल्याची पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे सीसीबी पोलिसांनी तेलंगणामध्ये रेड्डींचा शोध सुरू ठेवला आहे. दरम्यान अटकेच्या भीतीमुळे त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी याचिका दाखल केल्याच समजते.

मार्केटींगच्या नावाखाली पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने बेंगळूरमधील अंबिडेंट मार्केटींग प्रा. लि. ने लाखो जणांना गंडा घातला होता. अंबिडेंटचा मालक फरीद याने जनतेकडून चिट फंडच्या नावे जमा केलेले कोटय़वधी रुपये अनेक जणांकडे गुंतविल्याचे चौकशीवेळी उघड झाले आहे. नोटाबंदीनंतर जुन्या नोटांच्या मोबदल्यात नव्या नोटा पुरविण्याचा अवैध व्यवसायही केल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या कार्यालयासह निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले होते. त्यानंतर त्यांच्या संस्थेतील आर्थिक व्यवहार बंद करण्यात आला होता.

या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी अंबिडेंट संस्थेचा मालक सय्यद अहमद फरीद याने अनेक ठिकाणी उंबरठे झिजविले होते. फरीदने बिल्डर ब्रिजेश, रमेश कोठारी, अलिखान आणि जनार्दन रेड्डी यांच्याकडे हे प्रकरण दडपण्यासाठी साकडे घातले होते. त्यानंतर मार्च महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) एका अधिकाऱयाला ताज वेस्ट एन्ड हॉटेलमध्ये भेटून प्रकरण दडपण्यासाठी जनार्दन रेड्डी यांनी बोलणी केली होती. याच्या मोबदल्यात फरीदने 20 कोटी रुपयांचे डील करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. करारानुसार 20 कोटी रुपये सोन्याच्या स्वरुपात देण्याची अट जनार्दन रेड्डींनी घातली होती. फरीदने अलिखान याची ओळख असलेल्या बळ्ळारीतील राजमहल फॅन्सी ज्वेलर्सचे रमेश यांच्यामार्फत बेंगळुरातील अंबिका सेल्स कार्पोरेशनचे रमेश कोठारी यांच्याकडून 18 कोटी रुपये किमतीचे 57 किलो सोन्याची बिस्कीटे खरेदी करून जनार्दन रेड्डींपर्यंत पोहोचविली होती,    अशी माहिती बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सुनीलकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

तपासानंतर पोलिसांनी राजमहल फॅन्सी ज्वेलर्सचे मालक रमेश यांना अटक करून महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. फरार असलेल्या जनार्दन रेड्डींचा शोध घेण्यासाठी सीसीबीचे एसीपी पी. टी. सुब्रह्मण्य, मरियप्पा, मोहनकुमार, मंजुनाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

Related posts: