|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » एक हजार एक प्रकल्प साकारण्याचा संकल्प पूर्णत्वाकडे

एक हजार एक प्रकल्प साकारण्याचा संकल्प पूर्णत्वाकडे 

प्रतिनिधी/ वाळपई

राजकारण हा समाजकारणाचा भाग बनला तर समाजाच्या विकासाला गती मिळणार आहे. खासदार निधीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रकल्प उभारताना आलेल्या समस्यांना समर्थपणे तोंड देत आतापर्यंत गेल्या चोवीस वर्षांत उत्तर गोव्याच्या विविध भागांमध्ये 88 सभागृहाची उभारणी करण्यात आलेली आहे. चार वर्षात एकूण 1001 प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर येणार असून यात खास करून सर्वसामान्यांच्या समस्यावर जास्त भर देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आयुष्य मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी केले आहे .

   खासदार निधीच्या माध्यमातून खडकी सत्तरी येथील रामचंद्र मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगरगाव जिल्हा पंचायत सभासद प्रेमनाथ हजारे, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, माजी पंचायतमंत्री व्यंकटेश देसाई, खोतोडा पंचायतीचे सरपंच ओमप्रकाश बर्वे, श्रीराम हायस्कूल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव राणे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब राणे, बाबुराव राणे पंचसदस्य शारदा हरिजन, संतोष गावकर, राजेश गावकर, राजेश पर्येकर, स्थानिक प्रतिनिधी सुरेश नागरे यांची खास उपस्थिती होती.

  नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे यावेळी बोलताना म्हणाले की, या भागात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक सभागृहाचा वापर चांगल्या कामासाठी होणे  गरजेचे आहे. यातून गावाचा एकोपा व एकजूट मजबूत होण्यास मदत मिळेल. आतापर्यंत खासदार श्रीपाद नाईक यांनी सत्तरीच्या विकासासाठी चांगले योगदान दिले असून अशाच प्रकारचे कार्य भविष्यातही त्यांनी सुरू ठेवावे, असे ते म्हणाले.

  माजी उपसभापती नरहरी हळदणकर, सरपंच ओमप्रकाश बर्वे, सामाजिक कार्यकर्ते विनायक सावईकर, राजेश गावकर यांनीही मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कार्याचा गौरव केला. माजी मंत्री बंडू देसाई यांनी गोव्यातील खाण व रानटी जनावरांची समस्या याबाबत लोकसभेत आवाज उठवावा अशी विनंती आयुषमंत्र्यांना केली.

यावेळी प्रकल्पपूर्तीसाठी योगदान देणारे उद्योजक विश्वासराव राणे, शैक्षणिक स्तरावर चांगली कामगिरी करणारे ऋषिकेत नांगरे, इंजिनियर सिताराम नाईक, ठेकेदार अमोल नावेलकर व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब राणे यांचा मंत्र्यांच्या हस्ते हस्ते सन्मान करण्यात आला.

  प्रारंभी विश्वासराव राणे यांनी प्रास्ताविक केले, आप्पासाहेब राणे यांनी सर्वांचे स्वागत केले. श्रीराम हायस्कूलच्या मुलांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपारिक समई प्रज्वलित करून करण्यात आले. सूत्रसंचालन गणपतराव राणे यांनी केले तर शेवटी राजेश राणे यांनी आभार मानले.

धारगळ आयुर्वेदिक प्रकल्पाची 13 रोजी पायाभरणी

 आतापर्यंत विविध ठिकाणी 71 स्मशानभूमीचे प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले आहे. 2012 साली इंडिया टुडे यांनी केलेल्या सर्वेक्षणात लोकसभेच्या सभासदांपैकी उत्तर गोव्याच्या खासदारांनी निधीचा विनियोग व्यवस्थितपणे करून केलेल्या विकास कामाच्या पार्श्वभूमीवर 31 वा नंबर लागला होता. 2014 साली हा क्रमांक 11 नंबरवर आला. आयुष मंत्रालयाचा वापर गोवा राज्यातील नागरिकांना व्हावा यासाठी सुमारे पाचशे कोटी खर्चून धारगळ या ठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलचा पायाभरणी समारंभ 13 नोव्हेंबर रोजी होणार असून सदर प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे यावेळी पुढे बोलताना मंत्री नाईक म्हणाले.