|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावरील नवीन प्रस्थानद्वाराचे उद्घाटन

दाबोळी विमानतळावरील नवीन प्रस्थानद्वाराचे उद्घाटन 

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या अतिरीक्त प्रस्थान गेटचे बुधवारी राज्याचे पंचायतमंत्री व दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी दाबोळी विमानतळाचे संचालक बी.सी.एच.नेगी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

दाबोळी विमानतळावर येणाऱया जाणाऱया प्रवाशांच्या सोयीसाठी दोन अतिरीक्त प्रवेशव्दार व प्रस्थानव्दारांची उभारणी करण्याची घोषणा अलिकडेच विमानतळ प्राधिकरणाने केली होती. त्यानुसार काल बुधवारी दुपारी एका प्रयाणव्दाराचे पंचायतमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाने विमानतळावर काही प्रसाधन गृहे उपलब्ध केलेली असून ही प्रसाधनगृहेसुध्दा बुधवारपासून प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. मंत्री गुदिन्हो यांनी या सुविधांची पाहणी केली. दाबोळी विमानतळावर आणखी एक प्रस्थानव्दार उभारण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना मंत्री गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळावर जागतीक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यात येत असून हवाई प्रवाशांची संख्या दिवसे दिवस वाढत असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी सोयीसुविधा वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दाबोळी विमानतळाला प्रवाशांचा वाढत प्रतिसाद मिळत असल्याने आता मोपा विरूध्द दाबोळी ही चर्चाही गायब होऊ लागलेली आहे. देशी प्रवाशांचासुध्दा गोव्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यासाठी चांगल्या सोयीसुविधा पुरवणे आवश्यक असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.