|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीत सोमवारपासून आंतरराष्ट्रीय योग संमेलन

पणजीत सोमवारपासून आंतरराष्ट्रीय योग संमेलन 

प्रतिनिधी/पणजी

कला अकादमीत सोमवारपासून आंतरराष्ट्रीय योग संमेलन होणार असल्याची माहिती आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. जनतेचे आरोग्यासाठी योग असे या संमेलनाचे उद्दिष्ठ आहे, असे नाईक यांनी सांगितले.

शुक्रवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत रणजीत कुमार व इतर मान्यवर उपस्थित होते. देशात योग दिवस स्थापन केल्यानंतर भारत सरकारने दरवर्षी योग संमेलन घेणे सुरु केले आहे. या संमेलनात जगभारातील योग संस्थांचे प्रतिनिधी भाग घेत असतात. यंदाचे पाचवे संमेलन आहे. पहिले संमेलन दिल्लीत, दुसरे चंदीगड, तिसरे लखनव, चौथे डेराडून तर यावर्षीचे पाचवे संमेलन गोव्यात होणार असून गोमंतकीयांना ती एक पर्वणीच ठरणार आहे, असेही श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

यंदाच्या या संमेलनात जगभरातील 50 देशातील सुमारे 1 हजार प्रतिनिधी भाग घेणार आहेत. गोव्यातील सगळ्य़ा योग संस्थाचाही या संमेलनात समावेश करून घेतला जाईल. 12 व 13 असे दोन दिवस होणाऱया या कार्यक्रमात गोव्यातील लोक संस्कृतीच्या आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातील.

 सोमवार 12 रोजी सकाळी कला अकादमी ते मिरामार सर्कल तसेच परत कला अकादमीपर्यंत मेरेथॉन स्पर्धा होणार आहे. रन फॉर योगा त्यानंतर केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते 10 वा. संमेलनाचे रितसर उद्घाटन होणार आहे. यावेळी श्री श्री रविशंकर तसेच इतर मान्यवर उपस्थित राहातील. 13 रोजी संध्याकाळी 3 वा. संमेलनाचा समारोप होणार आहे. यावेळी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा, मानव संसाधन विकासमंत्री डॉ. सत्यपाल सिंह, रामचंद्र मिशन हैद्राबादचे अध्यक्ष कमलेश डी. पटेल व श्रीपाद नाईक यांची उपस्थिती लाभणार आहे.

 दरम्यान, धारगळ येथे होणाऱया अखिल भारतीय आयुर्वेद योग आणि प्राकृतिक चिकित्स संस्थान गोवा याची मान्यवरांच्या हस्ते पायाभरणी होणार आहे. यावेळी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, आयुषमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पर्यटनमंत्री मनोहर आजंगावकर, आयुष मंत्रालय भारत सरकारचे सचिव वैद्य राजेश कोटेचा व गोव्याचे मुख्य सचिव धेर्मेंद्र शर्मा यांची उपस्थिती लाभणार आहे.