|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » आता निवडणूक नाही!

आता निवडणूक नाही! 

 

 

@ पुणे / प्रतिनिधी:

 पुण्यात शिक्षण घेताना विविध महाविद्यालयीन निवडणुका पवार पॅनेलच्या माध्यमातून लढवल्या आणि जिंकल्याही. या निवडणुकीमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी असायचे. तेव्हापासून आजपर्यंत संघटन करण्याचे काम केले. आज राजकारणातील कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण होत असून, पुण्याच्या त्या निवडणुका हाच त्याचा पाया आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार पुणे शहराविषयीच्या जुन्या आठवणींना सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान उजाळा दिला. या मुलाखतीत आता पुण्याचे नेतृत्त्व करायला आवडेल का?, असा प्रश्न सुधीर गाडगीळ यांनी केला असता. त्यावर ‘आता निवडणूक नाही’, असे सांगत पवारांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात चर्चांना पूर्णविराम दिला.

जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे कॉफीटेबल बुक ‘पुणे एकेकाळी आणि स्मरणरम्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘आठवणीतले पुणे’ या विषयावर सुधीर गाडगीळ यानी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून आजअखेर पर्यंतच्या पुणे शहरातील अनेक आठवणीना उजाळा देखील दिला. यावेळी लेखक मंदार लवाटे, पेपरलीफचे संस्थापक जतन भाटवडेकर उपस्थित होते.

अपमानातून विधानसभेत आलो

एकदा मुंबई पहायला गेलो असताना विधानसभेत गेलो. प्रेक्षक गॅलरीत बसून तेथे अत्रेचे भाषण ऐकताना माझ्याकडून नीट बसण्याच्या संदर्भातील नियम मोडले गेले, त्यावेळी मला तिथल्या माणसाने कॉलरला धरुन बाहेर काढले. त्यावेळी रमी याला म्हटले की आलोच आहे, तर आता थेट आमदार म्हणूनच येतो, आणि या अपमानातून मी विधानसभेत पोहोचल्याची आठवण यावेळी शरद पवार यांनी सांगितली.

अन् नृत्यात सुवर्णपदक मिळविले

कॉलेजमध्ये असताना एका मुलीने कारण नसताना माझ्याशी आणि श्रीनिवास पाटील यांच्याशी भर रस्त्यात भांडणे केली. ती शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेत होतीं नाचायला सुध्दा अक्कल लागते, असे तिने आम्हाला सुनावले. याचा राग येऊन श्रीनिवास पाटील यांनी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आणि विद्यापीठात सुवर्णपदक मिळविल्याची आठवण शरद पवार यांनी सांगितली.