|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बिबटय़ानंतर आता गवीरेडय़ाची धास्ती

बिबटय़ानंतर आता गवीरेडय़ाची धास्ती 

राष्ट्रीय महामार्गानजीक गवीरेडय़ाचे वास्तव्य, वनविभागासमोर मोठे आव्हान

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर व परिसरात वन्यजीवांचा वावर होत असून मागील 4 दिवसांपासून बिबटय़ाच्या दहशतीखाली असलेल्या बेळगावकरांना आता गवीरेडय़ाची धास्ती लागली आहे. सोमवारी सकाळी हा रेडा भुतरामहट्टी येथे महामार्गाशेजारी आल्याने वाहनचालक व वनकर्मचाऱयांची तारांबळ उडाली. त्याला महामार्गावरून जंगलात हुसकावण्यासाठी काही काळ पुणे-बेंगळूर महामार्ग रोखावा लागला.

मागील आठवडय़ातही या गवीरेडय़ाने काही प्रवाशांना दर्शन दिले होते. तेव्हापासून त्याचे याच परिसरात वास्तव्य असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. रस्ता चुकून अन्नाच्या शोधार्थ तो भुतरामहट्टी परिसरात आला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. एकीकडे बिबटय़ांची दहशत तर दुसरीकडे या गवीरेडय़ाच्या वास्तव्यामुळे वनविभागाची पुरती तारांबळ उडाली आहे.

सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास भुतरामहट्टी येथील चन्नम्मा विद्यापीठाच्या शेजारील महामार्गावर हा गवीरेडा दृष्टीस पडला. याची माहिती वनविभागाला समजताच काकती वनक्षेत्रातील वनकर्मचाऱयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गाच्या शेजारीच असणाऱया एका झाडाखाली तो होता. कोणत्याही क्षणी तो महामार्गावर येऊन अपघात होऊ शकेल, अशी शक्मयता बळावताच त्याला हुसकावण्यासाठी फटाके उडविण्यात आले. यावेळी काही काळ पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला होता. फटाक्मयांचा आवाज ऐकताच तो काही अंतर जाऊन पुन्हा तेथेच बसला. त्यापुढे वनविभागाचे तारेचे कुंपण असल्याने त्याला पुढे जाता येत नव्हते. त्यामुळे त्याने तेथेच ठिय्या ठोकला. त्यामुळे वनकर्मचाऱयांना त्याच्यावर लक्ष ठेवून राहावे लागले. सायंकाळपर्यंत तो त्याच परिसरात फिरताना आढळून आला. या परिसरात चन्नम्मा विद्यापीठाबरोबरच शेख इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची वर्दळ असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.

बिबटय़ा असल्याची केवळ अफवाच

 चार दिवसांपूर्वी हिंडाल्को परिसरात आढळलेला बिबटय़ाच भुतरामहट्टी येथे असल्याची अफवा शहरात पसरली. यामुळे काही हौशी भुतरामहट्टी येथे पोहोचले. तेथे महामार्गावर बघ्यांचीच गर्दी अधिक होती. तो बिबटय़ा नसून गवीरेडा असल्याचे दृष्टीस पडताच अनेकांचा हिरमोड झाला.  

 

Related posts: