|Sunday, August 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कंसाची झोप उडाली

कंसाची झोप उडाली 

श्रीकृष्ण व बलराम हे दोघे स्वच्छंदपणे मथुरा नगरीत फिरत असता सूर्यास्त झाला. लक्ष्मी आपणास मिळावी असे इच्छिणाऱया इतरांचा त्याग करून लक्ष्मीने ज्यांना आपले निवासस्थान बनविले, त्याच पुरुषभूषण श्रीकृष्णांचे अंगोपांगांचे सौंदर्य मथुरावासी पहात होते. भगवान इकडे येतेवेळी व्रजातील गोपी विरहातुर होऊन मथुरावासियांबद्दल जे जे काही बोलल्या होत्या, ते सर्व मथुरेत खरे ठरले. नंतर गोपालांसमवेत ते नगराच्या बाहेर गोकुळवासियांचे छकडे जेथे होते तेथे परत आले. नंदबाबांनी बालकांना सकाळीच सांगितले होते-हे पहा, हे आपले गोकुळ नाही. मथुरा आहे. शहाणे होऊन शांतीने हिंडा फिरा. कोठे दंगा मस्ती करू नका. आता ते परत आले तर नंदबाबांनी त्यांना विचारले-काय, शहर पाहून आलात? कुठे कांही दंगा मस्ती तर केली नाही ना? कान्हा म्हणाला-नाही हो, आम्ही तर काहीच केलेले नाही. लोक मला परिचय विचारीत होते, तर मी सांगत होतो की मी नंद यशोदेचा मुलगा आहे. बाबा! माझा परिचय समजल्याबरोबर लोकांनी आम्हाला हे चांगले चांगले कपडे दिले आणि फुलांच्या माळा गळय़ात घातल्या. बिचारे भोळे नंदबाबा! त्यांनी मुलांच्या गोष्टी खऱया मानल्या. मी या शहरातील यादवांशी शुभ अशुभ प्रसंगी योग्य व्यवहार करीत आलो आहे. ते माझ्या मित्रांसारखेच आहेत. तेव्हा माझ्या मुलांना काही ना काही देतील हे स्वाभाविकच आहे. कन्हैयाने पुनः पुन्हा म्हटले-बाबा मी तुमचा मुलगा आहे याचसाठी हे सर्व काही आम्हाला मिळाले आहे. श्रीकृष्णांनी नंदबाबांची पुत्रभावना कायम ठेवली. रात्रीच्या वेळीं ते सर्व जेवण करायला बसले. व्रजवासींनी आपल्याबरोबर खाण्यापिण्याची पुष्कळ सामग्री आणली होती. कृष्णाला यशोदामाई आणि आपली गंगी गाय यांची आठवण येत आहे. माझ्याविना माझी आई आणि गंगीची काय दशा झाली असेल बरे? कृष्णाचें जेवण्यात मन लागत नाही. नंतर सर्वजण झोपी गेले. कंसाचे दुष्ट मनोगत जाणूनही त्या रात्री बलराम व कृष्ण तिथेच आरामात झोपी गेले. इकडे जेव्हा कंसाने असे ऐकले कीं, कृष्ण बलरामांनी धनुष्य तोडले, त्याचे रक्षक आणि त्यांच्या मदतीसाठी पाठविलेल्या सेनेचासुद्धा संहार केला आणि हे सर्व म्हणजे त्यांचा एक खेळ होता, तेव्हा तो अतिशय घाबरला. त्या दुर्बुद्धीला उशिरापर्यंत झोप आली नाही. जागेपणी आणि स्वप्नातसुद्धा त्याला मृत्यूचे सूचक पुष्कळसे अपशकून झाले. जागेपणी त्याला असे दिसे की, त्याच्या शरीराचे प्रतिबिंब असूनही त्याला मस्तक नसे. मध्ये बोट वगैरे नसूनही चंद्र इत्यादी त्याला दोन दोन दिसत. सावली दुभंगलेली दिसे आणि कानात बोटे घालूनही घूं घूं असा आवाज ऐकू येत नसे. झाडे सोनेरी दिसत होती आणि धुळीत स्वतःच्या पायांचे ठसे दिसत नव्हते. कंसाला झोपेत भयानक स्वप्ने पडत होती, तर जागेपणी चित्रविचित्र भयानक भास होत होते. नेमके काय होत आहे हे त्याला समजत नव्हते.

Ad. देवदत्त परुळेकर