|Sunday, August 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जाऊ नये असे काही

जाऊ नये असे काही 

पूर्वी अमुक तिथीला महिलांनी चिंचेच्या झाडाखालून जाऊ नये, किंवा कोणीही पिंपळाच्या झाडाखालून जाऊ नये, किंवा रात्रीच्या वेळी निर्मनुष्य भागातील फलाण्या वाटेवरून जाऊ नये वगैरे निर्बंध होते. कारण काय, तर म्हणे त्या जागांवरून गेलं तर भुते झपाटतात. आता बिल्डर नावाच्या जमातीमुळे मोकळय़ा जागा राहिल्या नाहीत, पुढाऱयांमुळे झाडे राहिली नाहीत. अभयारण्यात अतिक्रमण झाल्यामुळे वाघ वगैरे लोक मनुष्यवस्तीत येतात. पण मोकळय़ा जागा आणि झाडे गायब झाल्यावर भुते कुठे गेली ते समजत नाही. वाघ मनुष्यवस्तीत येतात तशी भुते कॉफी शॉपमध्ये किंवा डान्स बारमध्ये किंवा मॉलमध्ये आल्याचे ऐकिवात नाही. ते असो. मनुष्यवस्तीत जाऊ नये एवढा नियम भुतांनी पाळला आहे हे काय कमी आहे?

माणसांनी देखील नव्या युगातले नियम पाळायला हवेत. म्हणजे मग त्यांचे जीवन सुखाचे होईल. काही सोपे नियम असे.

जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पहाटे फिरायला जाऊ नये. नव्या वर्षाचा संकल्प म्हणून व्यायामाला सुरुवात करणाऱयांची सगळीकडे गर्दी असते. जी आठेक दिवसात ओसरते!

सणासुदीला किंवा लग्नसराईत किंवा शुभमुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करायला जाऊ नये. त्या काळात भाव जास्त असतात. 

राष्ट्रीयीकृत बँकेत तुमचे खाते असेल तर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बँकेत फिरकू नये. आमच्यासारख्या पेन्शनर लोकांची त्या वेळी बँकेत गर्दी असते.

घरात लग्नकार्य निघाले असेल तर घरोघरी आमंत्रणे देण्याचे काम दुसऱयाच्या गळय़ात मारावे. अगदीच नाइलाज झाला तर शक्मयतो लोकांच्या कचेरीत जाऊन आमंत्रण द्यावे. घरी गेल्यास चहाचा भीषण आग्रह होतो. कचेरीत होत नाही.

परिचितांच्या घरात नुकतेच लग्नकार्य पार पडले असेल तर निदान वर्षभर त्यांच्या घरी जाऊ नये. घरी गेलात तर लग्नाच्या आल्बममधले हजारभर फोटो किंवा चित्रफीत बघावी लागते. अशा वेळी एक उपाय आहे. जायचेच झाले तर चष्मा तुमानीच्या खिशात लपवावा. यजमानांनी आल्बम किंवा सीडी काढली की लगेच चष्मा विसरल्याचे सांगावे.  दिवाळी नुकतीच संपलेली असेल तर कोणाच्याच घरी जाऊ नये. त्यांच्याकडे इतरांकडून आलेला आणि त्यांना न आवडलेला किंवा त्यांच्या घरातला उरलेला फराळ आपल्या ताटात वाढला जाऊ शकतो. यामध्ये मऊ पडलेल्या चकल्या, कडक लाडू, डब्याच्या तळाशी उरलेला खारट चिवडा, खुळखुळय़ाप्रमाणे वाजणाऱया करंज्या वगैरे पदार्थ असू शकतात.