|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » केरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला

केरोसीनचा लाखो लिटरचा काळाबाजार रोखला 

जिल्हय़ात हमीपत्राच्या सक्तीमुळे मोठी ‘बचत’ : 72 टक्के धान्य वितरणही मशीनद्वारे

180 किलोलिटर केरोसीनची बचत

एक किलोलिटर म्हणजे 1 हजार लिटर

180 किलोलिटर म्हणजे 1.80 लाख लिटर

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

 ऑनलाईन पद्धत्तीने धान्य वाटपामध्ये आता प्रगती झाली असून ऑक्टोबर मध्ये 72 टक्के धान्य वितरण मशीनद्वारे झाले आहे. शिधापत्रिकाधारकांनी गॅस जोडणी घेतली नसल्याचे हमीपत्र करण्याची सक्ती करताच सिंधुदुर्ग जिल्हय़ात तब्बल 180 किलो लिटर केरोसीन (एक किलो म्हणजे एक हजार लिटर) म्हणजेच पंधरा केरोसिन टँकरची बचत झाली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नितिन राऊत यानी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे जिल्हय़ात दरमहा 180 किलो लिटर केरोसीनचा काळाबाजार होत असल्याचेही उघड झाले.

 पुरवठा विभागामार्फत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी सहाय्यक पुरवठा अधिकारी तानाजी पाटोळे, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संजय गवस, सहाय्यक माहिती अधिकारी हेमंत चव्हाण आदी उपस्थित होते.

गॅस जोडणी नसल्याबाबत हमीपत्र

अनुदानित केरोसीनचे वितरण ज्या शिधापत्रिकाधारकांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील नावे गॅस नाही, अशा शिधापत्रिकाधारकाचा आधार क्रमांक सादर केल्यानंतर करण्यात येते. ऑगस्ट 2018 पासून केरोसिनचा लाभ घेणाऱया सर्व शिधापत्रिकाधारकांकडून त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे गॅस जोडणी नसल्याबाबत हमीपत्र घेण्यात येत आहे. जिल्हय़ात गॅस वितरकांकडून गॅस जोडणीधारकांच्या याद्या घेऊन त्या दुकानदारांना पुरविण्यात आल्या आहेत. नागपूर खंडपीठाच्या 12 सप्टेंबर 2018 च्या आदेशानुसार नवीन गॅस जोडणीसाठी शिधापत्रिका अनिवार्य करण्यात आली आहे. गॅस वितरकांकडून गॅस स्टॅम्पिंग करणे आवश्यक झाले आहे. यापूर्वी दिलेल्या गॅस जोडणीधारकांच्या शिधापत्रिकांवरही गॅस वितरकांनी गॅस स्टॅम्पिंग करणे आवश्यक आहे. या कामात हयगय केल्यास, जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

..तर दुकानदारांवरही कारवाई

हमीपत्र, आधार क्रमांकाशिवाय केरोसीन वितरण केल्यास दुकानदारांवरही कारवाई केली जाणार आहे. हमीपत्रामध्ये खोटी माहिती देणे, दिशाभूल करणे, पात्र नसताना अनुदानित केरोसीनचा लाभ घेणे, अशा बाबी निदर्शनास आल्यास संबंधित शिधापत्रिकाधारकावर कारवाई करण्यात येणार आहे. हमीपत्र घेऊन, केरोसिन वितरीत केल्यामुळे सुमारे 180 किलो लिटर इतकी केरोसीनची बचत झाली आहे. दरमहा 180 कि. लिटर केरोसीनची बचत होऊ लागल्याने निच्छितच यापूर्वी 180 किलो लिटर केरोसीनचा काळा बाजार होत असल्याचे पुरवठा अधिकाऱयांनी मान्य केले. मात्र यापुढे हमीपत्राच्या सक्तीमुळे काळाबाजार होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

ऑनलाईन पद्धत्तीने धान्य वाटपामध्ये शिधापत्रिकाधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या अडचणी दूर करण्यात येत असून लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात न जाता धान्य दुकानदारांशी संपर्क साधून नावातील बदल, आधार कार्ड जोडणी किंवा हमीपत्रे देण्यात यावीत, असे आवाहन पुरवठा अधिकाऱयांनी केले.

72 टक्क्यापर्यंत ऑनलाईन धान्य वाटप

सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये 430 रास्तभाव धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेमधील 24 हजार 423 शिधापत्रिकांना तसेच प्राधान्य कुटुंब योजनेमधील 5 लाख 90 हजार 264 लाभार्थ्यांना दरमहा 1425 मेट्रीक टन गहू, 2382 मेट्रीक टन तांदूळ व अंत्योदय योजनेसाठी तीन महिन्यांसाठी 709 क्विंटल साखर वितरण करण्यात येते. मे 2018 मध्ये ऑनलाईन पद्धत्तीने धान्य वाटपास सुरुवात झाल्यानंतर 26 टक्के धान्य वितरण मशीनद्वारे झाले होते. ते ऑक्टोबर 2018 मध्ये 72 टक्क्यापर्यंत गेले आहे. पुढील दोन महिन्यात ते शंभर टक्क्यांपर्यंत होईल, असे सांगण्यात आले.

Related posts: