|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास

विनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास 

प्रतिनिधी / ओरोस:

आठवर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली चिंदर-भटवाडी येथील भिकाजी विठ्ठल गावकर (53) याला जिल्हा विशेष न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील स्वप्नील सावंत यांनी काम पाहिले.

आई-वडील शेतात कामासाठी गेल्याने शाळेतून आल्यानंतर पीडित मुलगी खेळण्यासाठी काही अंतरावर घर असलेल्या शेजाऱयांकडे गेली होती. ती घरी येताना भिकाजी गावकर याने ती एकटी असल्याची संधी साधून तिच्याशी अश्लील वर्तन केले. 25 जुलै 2017 रोजी ही घटना घडली होती. 27 जुलैला पीडित मुलीच्या आईने याबाबतची तक्रार आचरा पोलीस ठाण्यात दिली होती. दाखल तक्रारीनुसार भिकाजी गावकर याच्याविरोधात भादंवि कलम 354 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा विशेष न्यायालयासमोर झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत आरोपीला दोषी ठरविण्यात आले असून तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचबरोबर दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने जादा कारावास भोगण्याचे आदेश देण्यात आले. तपासी अंमलदार म्हणून आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धुमाळे यांनी काम पाहिले.

Related posts: