|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कातवणेश्वरला क्रौर्याची परिसीमा

कातवणेश्वरला क्रौर्याची परिसीमा 

दोघा काकांकडून पुतणीचा निर्घृण खून : गळा दाबून दगडाने डोके ठेचले : मदतीसाठी बोलावून घेतला जीव

आईसोबत राहत होती कु. प्रीतम

जमिनीच्या वादातून काका बनले वैरी

घरानजीकच बागेत केला खून

खुनानंतर ‘तो मी नव्हेच’ची भूमिका

मध्यरात्रीच दोघांनाही घेतले ताब्यात

प्रतिनिधी / देवगड:

देवगड तालुक्यातील कातवणेश्वर येथील कु. प्रीतम शशिकांत सावंत (35) हिचा तिच्या सख्ख्या व चुलत काकांनी प्रथम गळा दाबून व नंतर दगडाने ठेचून निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी प्रीतमचा चुलत काका आनंद शंकर सावंत (39) व सख्खा काका विजय दत्ताराम सावंत (55) या संशयितांविरुद्ध भादंवि कलम 302 व 34 अन्वये गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. हा खून जमिनीच्या वादातून झाल्याचे देवगड पोलीस निरीक्षक सुधीर शिंदे यांनी सांगितले. जिल्हय़ात खुनाची आठवडय़ातील ही दुसरी घटना असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतम ही कातवणेश्वर येथे आईसोबत राहत होती. तिच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेथील जमीन व घराच्या कुंपणावरून प्रीतम व तिच्या चुलत्यांमध्ये वाद सुरू होते. संशयित काका विजय सावंत याच्याशी तिचे संभाषणही बंद होते. मंगळवारी सायंकाळी प्रीतम कुणकेश्वर येथे कामानिमित्त गेले होती. सायंकाळी 6.30 च्या सुमारास ती घरी परतली. यावेळी तिचा चुलत काका आनंद हा प्रीतमच्या घरी गेला. त्याने प्रीतमला ‘पेडणेकरांच्या घरातील भाताची गोणी उचलण्यासाठी मदतीला चल’, असे सांगितले. यावेळी प्रीतमने त्याला थांबवून दिवाळीचा फराळ दिला. तो खाल्ल्यानंतर आनंदने त्याच्याकडील बॅटरी तिच्या घरी ठेवली व तिच्याकडील मोठी बॅटरी घेऊन ते दोघे पेडणेकरांच्या घरी निघाले.

बहाणा करून नेले अन् ठेचून मारले!

आनंद याची पूर्वीपासून प्रीतमवर वाईट नजर होती. त्याने बहाणा करून प्रीतमला घराबाहेर आणले. मात्र, तिला पेडणेकरांच्या घरी न नेता तेथील प्राथमिक शाळेनजीकच्या रामभाऊ दत्तात्रय सावंत यांच्या कलमबागेत नेले. तेथे दबा धरून बसलेला त्याचा सख्खा काका विजय सावंत व आनंद या दोघांनी संगनमत करून प्रीतमशी झटापट सुरू केली. मात्र, तिने तीव्र प्रतिकार केल्याने आनंद व विजय यांनी दगडाने तिचे डोके ठेचले.

आईचा संशय बळावला

प्रीतमला गंभीर अवस्थेत तेथेच टाकून दोघांनीही तेथून पळ काढला. आनंद हा पुन्हा प्रीतमच्या घरी गेला व तेथे ठेवलेली छोटी बॅटरी घेतली. घामाघूम अवस्थेत आलेल्या आनंदकडे आईने प्रीतमची चौकशी केली. त्यावर ‘प्रीतम ही महादेव वस्त यांच्याकडे गेली आहे’, असे सांगून आनंद तेथून निघून गेला. मात्र, उशिरापर्यंत प्रीतम घरी न परतल्याने आईचा संशय बळावला.

मारेकरीच निघाला मदतीला, केली दिशाभूलही

घाबरलेली वृद्ध आई प्रीतमच्या शोधासाठी घराबाहेर पडली. तिला गाठत आनंदने आपणही प्रीतमला शोधण्यास येत असल्याचे सांगितले. मात्र, आईला अधिकच भीती वाटल्याने तिने नजीकच्या सानिका बोरकर, प्रिया बोरकर, साई बोरकर, विनायक सावंत, नंदू वस्ते, रामभाऊ सावंत, हेमा सावंत, अनिता सावंत यांना सोबत घेऊन शोधकार्य सुरू केले. हे सर्वजण घटनास्थळाकडे जात असतानाच आनंदने त्यांची दिशाभूल करीत सर्वांना वेगळय़ा मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला.

प्रीतमच्या विव्हळण्याचा आवाज आईच्या कानी

याचवेळी, घरानजीकच्या रामभाऊ सावंत यांच्या बागेतून ‘पप्पा।़।़।़ पप्पा।़।़।़’ असा विव्हळणारा प्रीतमचा आवाज आईच्या कानी पडला. तिने सर्वांना याची कल्पना दिली. त्यानंतर तात्काळ आवाजाच्या दिशेने रामभाऊ सावंत यांच्या बागेत शोधाशोध करण्यात आली. यावेळी बागेतील गडग्यानजीक प्रीतम रक्ताच्या थारोळय़ात पडलेली दिसली.

घरापासून अवघ्या दीडशे मीटरवर होती प्रीतम

घटनास्थळापासून प्रीतमचे घर अवघ्या दीडशे मीटरवर आहे. मात्र, मिट्ट काळोखात तिच्यावर अचानक झालेल्या जीवघेणा हल्ल्यात तिचा प्रतिकार तोकडा पडला. प्रीतमचे डोके ठेचलेले पाहून तिच्या आईने हंबरडा फोडला. मदतकर्त्यांनाही काही काळ सुचेनासे झाले. शेवटी आईनेच पुढाकार घेत मदतकर्त्या ग्रामस्थांच्या मदतीने प्रीतमला खासगी वाहनातून देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी प्रीतमचे काही नातेवाईकही रुग्णालयात आले.

खासगी रुग्णालयांचा उपचारास नकार

देवगड ग्रामीण रुग्णालयात डॉ. भगत यांनी प्रीतमवर उपचार सुरु केले. ती बेशुद्ध होती. तिची प्रकृती खूपच चिंताजनक बनल्याने तिला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्याच्या सूचना डॉ. भगत यांनी नातेवाईकांना केल्या. यावेळी नातेवाईकांनी तिला येथील खासगी रुग्णालयात नेण्याचे ठरविले. मात्र, तिच्यावर येथे उपचार शक्य नसल्याने खासगी रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिला.

108 रुग्णवाहिकेने हलविले कणकवलीला

प्रीतमच्या डोक्यातून, नाका-तोंडातून मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. अखेर, 108 रुग्णवाहिकेतून तिला कणकवलीत नेऊन तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु करण्यापूर्वीच मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.

मध्यरात्रीच घेतले संशयितांना ताब्यात

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून प्रीतमची आई ज्योत्स्ना शशिकांत सावंत (66) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, पोलीस नाईक प्रशांत जाधव, मनोज पुजारे, महिला पोलीस सुप्रिया भागवत यांनी कातवणेश्वर येथे जात संशयित आनंद सावंत व विजय सावंत यांना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.

विभागीय पोलीस अधिकाऱयांकडून पाहणी

बुधवारी पहाटे विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्यासह देवगड पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास फॉरेन्सिक लॅब व पोलिसांच्या ‘आय-बाईक’ च्या पथकानेही घटनास्थळावरील रक्ताच्या डागाचे नमुने व इतर पुरावे गोळा केले. 

कणकवली पोलिसांतून गुन्हा देवगडकडे वर्ग

प्रीतमच्या मृतदेहाचे विच्छेदन बुधवारी सकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. कणकवली पोलिसांनी संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून हे प्रकरण देवगड पोलिसांकडे वर्ग केले. सायंकाळी हा गुन्हा देवगड पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली, असे शिंदे यांनी सांगितले.

प्रीतम होती धाडसी स्वभावाची

प्रीतम ही हुशार व धाडसी स्वभावाची मुलगी होती. वडिलांच्या निधनानंतर गावी आईसोबत राहून कुटुंबाचा आंबा व्यवसाय ती पाहत होती. तिच्या सख्ख्या चुलत्यांशी जमिनीच्या वादातून वैर असल्याने ती त्यांच्यापासून दूरच राहणे पसंत करीत होती. मात्र, कोणत्याही गोष्टीवरून वाद झाल्यास ती त्यांना सडेतोड उत्तर देत असे. जमीन जागेबाबतची सर्व शासकीय कामे, बागेतील व्यवहार ती कुणाचीही मदत न घेता करीत असे. वडिलांच्या निधनानंतर तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व ती गावी परतली. तिला पाळीव प्राण्यांची आवड होती. घरात तिने कोंबडी, मांजर व गुरांचेही पालन केले होते.

दोन वर्षांपूर्वी देखील झाली होती मारहाण

19 सप्टेंबर 2016 रोजी प्रीतम व तिची आई ज्योत्स्ना हिला संशयित विजय सावंत व त्याची पत्नी यशोदा उर्फ विद्या विजय सावंत या दोघांनी जमिनीच्या वादातून मारहाण केली होती. यात आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या खटल्याचा निकाल 23 जानेवारी 2018 रोजी न्यायालयाने विजय सावंतच्या बाजूने दिला होता. याबाबत, प्रीतम ही तत्कालीन तपासी पोलीस अंमलदार व वैद्यकिय अधिकाऱयांविरोधात दावा दाखल करण्याच्या तयारीत होती. वैद्यकीय अधिकाऱयांनी खोटा दाखला दिल्याने आपल्याविरोधात निकाल लागल्याबाबतचे पुरावे तिने गोळा केले होते. ती काही दिवसांतच न्यायालयात दावा दाखल करणार होती, अशी माहिती प्रीतमच्या वकिलांनी पत्रकारांना दिली.

कट रचून खून केल्याची कबुली

आनंदची प्रीतमवर वाईट नजर होती. तर विजय सावंत याचा तिच्याशी जमिनीवरून वाद होता. तो सतत प्रीतम व तिच्या आईला शिवीगाळ करीत असे. चार दिवसांपूर्वीच प्रीतमशी त्यांचा घराच्या कुंपणावरून वाद झाला होता. या दोघांनीही संगनमत करूनच बहाण्याने तिला घराबाहेर बोलाविले व तिचा खून केला. डोके दगडाने ठेचण्यापूर्वी त्या दोघांनीही प्रीतमचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या शरीरावरही झटापटीच्या खुणा आहेत. या खुनाची कबुली दोन्ही संशयितांनी दिली असल्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

आईचा आक्रोश काळीज पिळवटणारा

प्रीतमचे पार्थिव कातवणेश्वरमध्ये आणल्यानंतर सायंकाळी चार वाजता तेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवाला तिच्या भावाने मुखाग्नी दिला. प्रीतमच्या पश्चात आई, तीन बहिणी व भाऊ असा परिवार आहे. दोन बहिणी विवाहित आहेत. तर एक बहीण मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. भाऊ खासगी कंपनीत नोकरीस आहे. गेली अनेक वर्षे ती आपल्या वृद्ध आईचा आधार बनली होती. तिच्या मृत्यूमुळे आईला मोठा धक्का बसला आहे. अंत्यसंस्कारप्रसंगी तिच्या आईने केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.

Related posts: