|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात

‘राजा शिवछत्रपती’चे काम अंतिम टप्प्यात 

प्रतिनिधी/ निपाणी

निपाणी शहराच्या वैभवात मोलाची भर ठरणारे राजा शिवछत्रपती भवनाचे काम जोमाने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही महिनाभरात होण्याची शक्यता आहे. असे असले तरी सदर भवन आवारात नियोजित व्यापारी गाळ्य़ांचा विषय मात्र संदिग्ध आहे.

प्रत्यक्ष 2012 साली येथील आंबा मार्केटच्या प्रशस्त जागेत राजा शिवछत्रपती भवनाचे काम सुरू झाले. मात्र वाढलेला खर्च, निधीची अडचण, प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष याचा परिणाम म्हणून 6 वर्षे झाली तरी काम पूर्ण झालेले नाही. मध्यंतरी तब्बल दीड वर्षे काम बंद अवस्थेत होते. त्यामुळे झालेल्या कामाचा दर्जा ढासळत चालला होता. याबद्दल शिवप्रेमींच्यावतीने आंदोलन उभारल्यानंतर प्रशासकीय पातळीवर अधिकचा निधी आणण्यासाठी तसेच थांबलेले काम सुरू व्हावे यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे सुरू झालेले काम आता अंतिम टप्प्यात असून महिनाभरात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सदर भवनसाठी 2009 साली नगरोत्थान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 5 कोटी निधीपैकी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यानंतर पालिकेच्या एसएफसी फंडातून 30 लाख रुपये तसेच आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाने कन्नड व सांस्कृतिक खात्याकडून 50 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नाने एसएफसीतून 1 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मिळाले. यानंतर माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर व सहकारी नगरसेवकांनी भवनासाठी अधिकच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी 1 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून अर्थ विभागाच्या संमतीनंतर हा निधी मिळणार आहे.

एकूण 4 कोटी 40 लाखाच्या निधीतून हे भवन होणार आहे. तत्कालीन नगरसेवक प्रवीण भाटले व सहकाऱयांच्या प्रयत्नामुळे तसेच तत्कालीन आमदार काका पाटील यांच्या सूचनेनुसार मंजूर झालेल्या प्रशस्त जागेत होत असलेले राजा शिवछत्रपती भवन हे परिसरातील शिवप्रेमींसाठी तसेच निपाणीसाठी वैभव ठरणार आहे. आतापर्यंत भवनाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून अद्याप फरशी तसेच रंगरंगोटीचे काम बाकी आहे. एक-दीड महिन्यात उर्वरित काम होणार आहे. यानंतर 19 फेबुवारीच्या सुमारास भवनाचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गाळे निर्मितीबाबत संदिग्धता

भवनाच्या आवारात नियोजित व्यापारी गाळ्य़ांच्या उभारणीचा प्रश्न मात्र कायम आहे. गेल्यावर्षी 3 सप्टेंबर रोजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत व्यापारी गाळ्य़ांसाठी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मात्र मोठा गदारोळ माजला होता. त्यानंतर अद्याप गाळे उभारणीसंदर्भात कोणत्याही हालचाली झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे गाळे होणार की नाही हे निश्चित सांगता येत नाही, अशी स्थिती आहे.

Related posts: