|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » झाकीर हुसेन, हृदयनाथ मंगेशकर यांना ‘पु.ल.पुरस्कार’

झाकीर हुसेन, हृदयनाथ मंगेशकर यांना ‘पु.ल.पुरस्कार’ 

ऑनलाईन टीम / पुणे :

मागील 14 वर्षे पुण्यात संपन्न होणारा पुलोत्सव यंदाच्या वषी पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अधिक दिमाखदार स्वरूपात आयोजित करण्यात आला असून 17 ते 25 नोव्हेंबर दरम्यान बहुरंगी कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना पुलोत्सवाची पर्वणी अनुभवता येणार आहे. यानिमित्त यंदाचा ‘पु. ल. स्मृती सन्मान’ उस्ताद झाकीर हुसेन यांना तर ‘जीवन गौरव’ पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, स्क्वेअर वन चे नयनीश देशपांडे, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, कॉसमॉस बँकेंचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहिणूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, मसाप चे कार्यअध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्टोरी टेलचे प्रसाद मिरासदार आणि ढेपे वाड्याचे नितीन ढेपे यावेळी उपस्थित होते.

यंदाचा पुलोत्सव ‘पु. ल. परिवार’ आणि ‘आशय सांस्कृतिक’च्या वतीने आणि ‘स्क्वेअर 1’च्या सहयोगाने होणार आहे. या महोत्सवास बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र साहित्य परिषद, व्ही. शांताराम फाउंडेशन, अ. भा. मराठी नाट्य परिषद, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यंदाच्या पुलोत्सवानिमित्त डॉ. जयंत नारळीकर आणि शि. द. फ़डणीस यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रूपये 25000 असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन शनिवार दिनांक 17 नोव्हेंबर सायंकाळी 5.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7.00 वाजता पुलंच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारा बहुरूपी पु. ल.’ हा दृक्‌-श्राव्य कार्यक्रम विजय पटवर्धन, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सादर करणार आहेत. त्यानंतर रात्री 9.30 वाजता, पुलंच्या पत्रलेखनावर आधारित ‘पुलंचे पोष्टिक जीवन’ हा कार्यक्रम मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी, प्रा. मिलींद जोशी आणि गिरीश कुलकर्णी सादर करणार असून हे सर्व कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहेत.

महोत्सवात रविवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी, सकाळी 11 वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषद येथे ’भाषा प्रभु पु. ल. या विषयावरील परिसंवादात डॉ. आशुतोष जावडेकर, रेखा इनामदार साने, गणेश मतकरी सहभागी होणार असून परिसंवादाचे सूत्रसंचालन मंगला गोडबोले करणार आहेत. त्याच दिवशी सकाळी 10 वाजता अर्काइव्ह थिएटर, प्रभात रोड येथे ज्ये÷ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. किरण व्ही. शांताराम आणि प्रकाश मगदूम यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय निर्मित पुलंच्या चित्रपटांच्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे.