|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू

कसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू 

भीषण अपघातात हेल्मेटचेही झाले तुकडे : मसदे येथील घटना

वार्ताहर / बागायत:

कसाल येथून मालवण-तोंडवळी येथे जात असताना मसदे गावडेवाडी बस थांब्यानजीक मोटरसायकलचा ताबा सुटून अनिल दत्तात्रय मठकर (60, रा. कसाल) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली.

मूळ बांदा येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे कॅटरींग व्यवसाय करीत असलेले अनिल मठकर हे गेली 15 वर्षे कसाल येथे वास्तव्यास हेते. सध्या ते कसाल येथे नवीन मंगल कार्यालयाचे बांधकाम करीत असल्याने शुक्रवारी सकाळी मुंबईहून आल्यावर आपल्या मोटरसायकल हिरो पॅशन प्रो (एमएचएडी 1458) ने कसाल- ओवळीये-विरण-मसदे-बागायतमार्गे तोंडवळी मधलीवाडी येथे सासुरवाडीला जात होते. मसदे गावडेवाडी एसटी शेडनजीक त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने मार्गदर्शक फलकाला धडक देऊन त्यापुढे असलेल्या झाडावर जोरात आदळले. त्यामुळे डोक्यावरील हेल्मेटचे तुकडे होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी या मार्गावरून जाणारे वेरळ येथील बाळकृष्ण खरात यांनी विरण बाजार येथील माजी सभापती अनिल कांदळकर यांना अपघाताची माहिती दिल्यानंतर कांदळकर यांनी घटनास्थळी धाव घेत मठकर यांचा मृतदेह हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याची व्यवस्था केली.

अपघाताची खबर मसदे पोलीस पाटील निनाद माडये यांनी मसुरे दूरक्षेत्राला दिल्यावर हवालदार संतोष नांदोसकर, कॉ. नितीन शेडगे, रुपेश गुरव यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती घेतली. हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आचरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस. बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, मठकर यांचे नातेवाईक मुंबई येथे असल्याने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मुंबई येथे नेण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मठकर हे सुरुवातीला मुंबई येथे गिरणी कामगार म्हणून नोकरी करून संप काळात कॅटरींग व्यवसाय करायचे. सध्या ते कसाल येथे नवीन मंगल कार्यालयाची उभारणी करीत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच कसाल येथील मित्रपरिवार व तोंडवळी येथील नातेवाईकांनी हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजया, पुतणे, मेहुणे असा परिवार आहे.

रुग्णवाहिका नादुरुस्त बनल्याने गैरसोय

मठकर यांना हिवाळे येथील रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली असता ती नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. यावेळी डॉ. डिसोजा, मसदे पोलीस पाटील निनाद माडये, चुनवरे पोलीस पाटील महेश परब, जितेंद्र परब, समीर पाटकर आदींनी सहकार्य केले.

Related posts: