|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले

लिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले 

हडी परिसरात खुलेआम वाळू उत्खनन : महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष

प्रतिनिधी / मालवण:

महसूल प्रशासनाने वाळू पट्टय़ांचे लिलाव न केल्याने मालवण तालुक्यातील हडी, कालावल, तोंडवळी येथे बेकायदा वाळू उत्खननास जोर आला आहे. रात्रीच्यावेळी चोरटय़ा मार्गाने काढण्यात येणारी ही वाळू सोन्याच्या भावाने विकली जात आहे. राजरोसपणे बेकायदेशीररित्या उत्खनन होणाऱया वाळूबाबत महसूल प्रशासन कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गणपती उत्सवानंतर सिंधुदुर्गातील वाळू पट्टय़ांचे महसूल प्रशासनाने लिलाव जाहीर करणे अपेक्षित असताना तीन महिने उलटून गेले, तरी अद्याप लिलाव प्रक्रिया होऊ शकलेली नाही. सध्या सिंधुदुर्गाच्या महसूल प्रशासनाने वाळू पट्टय़ांचे लिलाव न लावल्याने चोरटी वाळू विक्री करणाऱया वाळू व्यावसायिकांचे फावले आहे. मालवण तालुक्यात तर चोरटय़ा वाळू विक्रीचे प्रकार वाढले आहे. हडी, कालावल, तोंडवळी येथे रात्रीच्यावेळी खाडीपात्रात उतरून बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा केला जात आहे. कालावल खाडीपात्रातील हडी कालिका मंदिर, तोंडवळी या भागात चोरटय़ा वाळू उपशाला जोर आला आहे.

परप्रांतीय कामगारांवर कारवाई का नाही?

खाडीपात्रातील वाळू काढण्यासाठी परप्रांतीय भैय्या कामगारांची आवश्यकता असते. वाळू लिलावच झालेले नसल्याने खाडीपात्राच्या किनारी येऊन वस्ती करून राहिलेल्या कामगारांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत चोरटी वाळू थांबणार नाही. महसूल प्रशासनाने यापूर्वी अनेकदा महसूलच्याच कर्मचाऱयांना नोटीस दिलेली होती. मात्र तरीही या कामगारांची नोंदणी पोलीस स्थानकात होत नसल्याचे दिसून येत आहे.

वाळूचे दर गगनाला भिडले

आठ हजार रुपयांना मिळणारा वाळूचा डंपर सध्या पंधरा ते तेरा हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. महसूल प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईमुळे अनेक वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात सडत आहेत. असे असतानाही चोरटय़ा वाळूला चांगला भाव मिळत असल्याने वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. मालवण शहर तसेच किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात बांधकामे उभी राहत असल्याने वाळूला मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत बेकायदेशीर वाहतूक आणि उत्खनन जोरात सुरू झाल्याचे दिसत आहे.

अपघातातील वाहनात चोरटी वाळू

मालवण तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका वाहनामध्ये मोठय़ा प्रमाणात वाळू सापडून आली होती. मात्र या अपघातप्रकरणी ना पोलीस, ना महसूल विभागाने दखल घेतली. त्यामुळे चोरटय़ा वाळू वाहतुकीला महसूल बरोबरच पोलीस प्रशासनाचाही आशीर्वाद आहे काय? अशी चर्चा शहरात आहे.

Related posts: