|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोन दुकाने, सात बंद घरे फोडली

दोन दुकाने, सात बंद घरे फोडली 

चोरटय़ांचा उच्छाद : फोंडाघाटला खळबळ : सेवानिवृत्त पोलिसाचेही घर लक्ष्य

पहाटे दोन ते पाचच्या दरम्यान चोऱया

तंटामुक्त समिती अध्यक्षांवर चोरटय़ांनी फेकले दगड

चोरटे तीनपेक्षा जास्त असल्याचा पोलिसांचा अंदाज

वार्ताहर / कणकवली:

फोंडाघाट बाजारपेठेतील दोन दुकाने व तेथीलच हवेलीनगर व माळवाडी येथील सात बंद घरांची कुलपे तोडून चोरटय़ांनी शुक्रवारी पहाटे फोंडाघाट मध्ये अक्षरशः उच्छाद मांडला. हवेलीनगर येथील सेवानिवृत्त पोलीस कमलाकर शंकर सावंत यांच्या घरातील कपाटामधील रोख 30 हजार रु. व घराबाहेर उभी असलेली नवीन होंडा शाईन दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले. फोंडाघाट तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुंदर पारकर यांच्या चाळीत राहत असलेल्या प्रा. बाजीराव यशवंत डाफळे यांच्या दरवाजाची कडी तोडत असताना आवाज आल्यावर पारकर हे बाहेर आले असता चोरटय़ांनी त्यांच्या दिशेने दगड भिरकावत पलायन केले. सुदैवाने पारकर जखमी झाले नाहीत. या सर्व घरफोडय़ा शुक्रवारी पहाटे दोन ते चार वाजण्याच्या सुमारास झाल्या. फोंडाघाट आऊटपोस्ट व चेकपोस्टपासून हाकेच्या अंतरावर एकाचवेळी नऊ ठिकाणी घरफोडय़ा झाल्याने खळबळ उडाली आहे.

कमलाकर सावंत यांचे मित्र प्रदीप वासुदेव तावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फोंडाघाट बाजारपेठेतील कुमार नाडकर्णी यांच्या मेडिकल स्टोअरचे कुलूप तोडत चोरटय़ांनी आत प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काही न लागल्याने त्यांनी ड्रॉवरमधील साहित्य व कागदपत्रे विस्कटून टाकली. ही बाब नाडकर्णी यांच्या पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. एकेक म्हणता तब्बल नऊ घरफोडय़ा झाल्याचे निदर्शनास आले. तसेच तेथीलच संतोष सावंत यांचे जनरल स्टोअरचे कुलूप तोडून चोरटय़ांनी त्यांच्या दुकानातील सामान विस्कटून टाकले. त्यांच्या टेबलच्या ड्रॉवरमधील काही चिल्लरवर चोरटय़ांनी हात मारला.

सेवानिवृत्त पोलिसाच्या घरातील 30 हजार रु. चोरीला

फोंडाघाट हवेलीनगर हा तसा वस्तीचा भाग असून काही बंद घरे व फ्लॅट चोरटय़ांनी लक्ष केले. यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे घर असलेले सेवानिवृत्त पोलीस कमलाकर सावंत हे काही दिवसांसाठी मुंबईला गेले होते. त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा व कुलूप तोडत चोरटय़ांनी घरात प्रवश केला. कपाटातील सामान विस्कटून टाकत त्यांनी तिजोरीतील 30 हजार रोख रक्कम लंपास केली. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी नवीन घेतलेली सुमारे 75 हजाराची होंडा शाईन दुचाकी चोरटय़ांनी पळविली.

तंटामुक्त समिती अध्यक्षांवर दगड भिरकावला

फोंडाघाट तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुंदर पारकर यांच्या चाळीत राहत असलेले प्रा. बाजीराव यशवंत डाफळे हे गावी गेले होते. पहाटे तीनच्या सुमारास ते राहत असलेल्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप चोरटे तोडत असताना आवाज झाला. त्यामुळे सुंदर पारकर घराबाहेर आले असता त्यांच्यावर अचानक चोरटय़ांनी दगड फेकत हल्ला केल्याची घटना घडली. मात्र आपल्या दिशेने येणारा दगड चुकवत पारकर यांनी आरडाओरड करताच तिघे चोरटे पसार झाले. तेथीलच प्रकाश देसाई यांचे घरही चोरटय़ांनी लक्ष केले. मात्र तेथे त्यांच्या हाती काही लागले नाही.

पोलिसांच्या हातावर तुरी देत चोऱया

चोरटय़ांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. पहाटे एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांची व्हॅन या भागातून पेट्रोलिंग करून आल्यानंतर या घरफोडय़ा झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरटय़ांनी तपासाचे आव्हान निर्माण केले आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल

घरफोडय़ांची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, उपनिरीक्षक जयश्री पाटील, फोंडाघाट दूरक्षेत्राचे हवालदार भगवान नागरगोजे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच ओरोसहून ठसे तज्ञ व न्याय सहाय्यक वैद्यकीय पथक घटनास्थळी दुपारी दाखल झाले होते. पोलिसांचे ‘आय बाईक’चे पथकही फोंडाघाटमध्ये दाखल होत त्यांनी तपासाच्या अनुषंगाने पुरावे घेतले.

चोरटे तीनपेक्षा जास्त असल्याचा अंदाज

या घरफोडय़ांमधील चोरटे हे तीनपेक्षा जास्त असल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी वर्तविला आहे. नाडकर्णी मेडिकल स्टोअर जवळ असलेल्या सीसीटीव्हीत तीन चोरटय़ांचा पायापर्यंतचा भाग दिसत असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे कोळी यांनी सांगितले.

 फोंडाघाटमधील पोलिसांच्या रिक्त पदांचा मुद्दा समोर

फोंडाघाट पोलीस दूरक्षेत्राच्या आसपास अनेक गावे येत असून हा ग्रामीण भाग असल्याने या-ना त्या कारणामुळे तेथे पोलिसांची आवश्यकता भासत असते. मात्र या दूरक्षेत्राचे पोलीस अनेकदा अन्य ठिकाणी कामगिरीवर असतात. त्यामुळे फोंडाघाट भागाची व्याप्ती विचारात घेत या तीनही पोलिसांना फोंडाघाटमध्ये कामयस्वरुपी राहण्यासाठी आदेश देण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी पोलीस निरीक्षकांकडे केली. तसेच स्थानिक पोलिसांमार्फतही रात्रीच्यावेळी गस्त घालण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे ग्रामस्थांनी सांगितले. 

पहाटे दोन ते पाच वाजेपर्यंत घरफोडय़ा

संजय मधुकर सावंत व पराग कमलाकर गोसावी, के. के. सुवर्णा यांचे कार्यालय, संदीप महादेव शिवगण यांच्या बंद घराचे कुलूप तोडत चोरटय़ांनी चोरीचा  प्रयत्न केला. मात्र तो फसला. प्रत्येक घरात चोरीच्या उद्देशाने गेलेल्या चोरटय़ांच्या हाती काही लागत नसल्याने त्यांनी घरातील कपाटे लक्ष्य करीत त्यातील सामान विस्कटून टाकले होते. तसेच कपाटांच्या तिजोऱयाही उघडून टाकल्या होत्या. फोंडाघाट येथे सत्यनारायण महापूजा असल्याने त्याच्या तयारीसाठी अनेकजण बाजारपेठेसह त्या भागात पहाटे दोन वाजेपर्यंत होते. पहाटे 2 ते 5 पर्यंतच्या कालावधीत चोरटय़ांनी संधी साधली.

Related posts: