|Sunday, August 25, 2019
You are here: Home » क्रिडा » कार्लसन-करुआना यांच्यातील पाचवा डावही बरोबरीत

कार्लसन-करुआना यांच्यातील पाचवा डावही बरोबरीत 

वृत्तसंस्था/लंडन

विद्यमान विश्वजेता मॅग्नस कार्लसन व अमेरिकन आव्हानवीर फॅबिआनो कारुआना यांच्यातील बुद्धिबळ विश्व अजिंक्यपदाच्या लढतीतील सलग पाचवा डाव देखील बरोबरीतच राहिला. उभय मास्टर्सनी 34 चाली व तीन तासांच्या खेळीनंतर गुणांच्या विभागणीला मान्यता दिली. उभयतात आता पाच डावांअखेर प्रत्येकी अडीच गुणांसह बरोबरी आहे.

या लढतीतील पहिले चारही डाव बरोबरीत राहिल्यानंतर एका दिवसाच्या विश्रांतीनंतर कार्लसन व कारुआनापैकी एक जण ही कोंडी फोडण्यासाठी जोमाने आणखी आक्रमक खेळ साकारेल, अशी अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली. कारुआनाने पुन्हा एकदा रोस्सोलिमा ओपनिंग केले तर कार्लसनने त्याला सिसिलियनने प्रत्युत्तर दिले आणि यामुळे पहिल्या व तिसऱया डावाचीच पुनरावृत्ती झाली. सहाव्या चालीला करुआनाने बी4 ही फारशी प्रचलित नसलेली व्हेरिएशन अंमलात आणली. पण, 13 वर्षांपूर्वी या व्हेरिएशनचा सामना केलेल्या कार्लसनने कारुआनाला त्याचा फारसा लाभ मिळू दिला नाही आणि हा डाव देखील बरोबरीत सुटला.

पहिल्या डावात विजयाची संधी साधता न आलेल्या कार्लसनला सहाव्या डावात पांढऱया मोहऱयांनी खेळता येणार असून त्यात तो नव्या व्हेरिएशनवर भर देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या चॅम्पियनशिपमधील सलग पाचव्यांदा बरोबरी झाली असली तरी येथे प्रथमच विद्यमान विश्वजेता मॅग्नस कार्लसन ओपनिंगमध्ये सफाईदार खेळू शकला नसल्याचे जाणवले. मॅग्नस पुन्हा एकदा सिसिलियनला चिकटून राहिला तर चौथ्या चालीला कॅसलिंग करत कारुआनाने राजा संरक्षित केला. कारुआनाची प्याद्याची सी4 ही चाल मध्यफळीवर वर्चस्व निर्माण करण्याच्या दिशेने होती. वास्तविक, पहिल्या टप्प्यातील काही चालीनंतर कारुआनाकडे एक प्यादे कमी होते. पण, पटावरील त्याची स्थिती मात्र अधिक भक्कम आणि कार्लसनच्या दृष्टीने धोकादायक स्वरुपाची होती. दहाव्या चालीपर्यंत कारुआनाने वेगवान खेळ साकारत आपल्या सुसज्जतेचा दाखला दिला. यावेळी काळय़ा मोहऱयांसह खेळणाऱया कार्लसनची पटस्थिती फारशी अनुकूल नव्हती. पण, तरीही त्याने कॅसलिंग करण्यात घाई केली नव्हती. दहाव्या चालीला त्याने कॅसलिंग केले. मात्र, तरीही या वळणावर एखादे मोहरे अधिक गमवावे लागले तरी त्याची मोठी किंमत काळय़ा मोहऱयांना मोजावी लागू शकते, असेच सुस्पष्ट संकेत होते.

15 व्या चालीला वजीर सी7 सह कारुआनाने वजीरावजीरीचा प्रस्ताव ठेवला आणि कार्लसनने देखील तो स्वीकारल्यानंतर पटावरचे दोन्ही वजीर बाजूला झाले. त्यानंतर उभयतांच्यात समसमान ताकदींच्या मोहऱयांची मारामारी होत राहिली आणि 34 व्या चालीला उभयतांनी बरोबरी मान्य केली.

‘ओपनिंगनंतर माझी पोझिशन अधिक चांगली होती. मी त्याच्यावर आणखी दडपण आणू शकलो असतो. पण, एकंदरीत मी आज सरस खेळू शकलो नाही’, असे कार्लसनने आपल्या खेळीचे विश्लेषण केले. अद्याप या लढतीतील एकही डाव निकाली झाला नसला तरी त्याचा कल मात्र लक्षवेधी स्वरुपाचा आहे. उभयतातील पहिला डाव तब्बल 7 तास व 115 चालीपर्यंत रंगला व वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील ती सर्वात प्रदीर्घकाळ चाललेली लढत ठरली. पण, त्यानंतर उभयतातील प्रत्येक डाव छोटेखानीच ठरत आला आहे. दुसरा डाव 49 चालीत, तिसराही तितक्याच चालीत, चौथा 34 चालीत तर पाचवा डाव 33 चालीत बरोबरीत सोडवला गेला.

पांढऱया मोहऱयांनी खेळत असतानाही कारुआनावर येथे काहीसे दडपण असल्याचे चित्र होते. कारण, कार्लसनने ड्रॉ जिंकल्यानंतर पहिला डाव काळय़ा मोहऱयांनी खेळणे पसंत केले होते. यामुळे नियमानुसार त्याला शुक्रवारी व रविवारी सलग दोन डावात पांढऱया मोहऱयांनी खेळण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर कारुआनाने सलग दोनदा काळय़ा मोहऱयांनी खेळणे आव्हानात्मक असल्याचे नमूद केले.

‘डबल ब्लॅकसह खेळणे आव्हानात्मक असेल. पण, कोणत्या तरी वळणावर त्याला सामोरे जावे लागणारच होते. अर्थात, आज काहीही निकाल लागला असता तरी त्या पुढील दोन लढतीत मोहरे बदलले जाणार नव्हते. त्यामुळे, आजच्या डावाकडे मी जसा पाहतो, त्याच दृष्टीने त्या पुढील दोन डावांकडेही पाहतो’, असे कारुआना स्पष्टीकरणार्थ म्हणाला.

चौथ्या डावापूर्वी यू-टय़ूबवरील ‘त्या’ व्हीडिओमुळे गोंधळ!

एरवी कोणत्याही ग्रँडमास्टरची विश्व चॅम्पियनशिपमधील तयारी खूप गुप्त ठेवली जाते. अगदी तयारीसाठी आपले सहकारी कोण आहेत, याचा उलगडाही केला जात नाही. याबाबत आनंदविरुद्ध खेळताना कार्लसनने आपल्या टीममध्ये कोण आहेत, हे उघड केले नव्हते, त्याचा दाखला देता येईल. पण, कारुआनाची टीम या चॅम्पियनशिपसाठी कशी तयारी करत आहे, हे दर्शवणारा एक व्हीडिओ चौथ्या डावादरम्यान यू-टय़ूबवर अपलोड झाल्यानंतर त्यामुळे काही काळ खळबळ उडाली. या व्हीडिओमध्ये कारुआना लॅपटॉपवर ओपनिंग्जच्या यादीवर नजर टाकत ती आपल्या सहकाऱयांकडे सुपूर्द करत असल्याचे दिसून आले. लिनिएर डॉमिंग्यूज, अलेजांद्रो रॅमिरो व ख्रिस्तियन शिरिला यांच्या ओपनिंग्जचा या यादीत समावेश होता. यापैकी, ख्रिस्तियन ही कारुआनाच्या टीममधील सहकारी मानली जाते. विश्वचॅम्पियनशिपसाठी तयारी करवून घेत असलेल्या सहकाऱयांना ‘सेकंड्स’ असे संबोधले जाते. यादरम्यान सदर व्हीडिओ यू-टय़ूबवरुन आता डिलिट केला गेला असला तरी त्याने बरीच वावटळ उठली असल्याचे स्पष्ट आहे. उभयतातील हा चौथा डाव 33 चालीअखेर बरोबरीत राहिला होता.