|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » इस्लामपुरात बहुचर्चित शेड अखेर उद्ध्वस्त

इस्लामपुरात बहुचर्चित शेड अखेर उद्ध्वस्त 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या येथील ख्रिश्चन बंगला परिसरातील दुमजली अनाधिकृत पत्र्याचे शेड अखेर नगरपालिका प्रशासनाने अखेर जे.सी.बी.च्या सहाय्याने उद्ध्वस्त केले. या शेडचे खणभाग सांगलीचे मालक फाजलूल रहमान कडलासकर यांनी धाव घेऊन नुकसान न होता. स्वतः ते काढून घेत असल्याचे लेखी दिले. शहरात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटावची ही मोहीम पहिल्यांदाच राबवली. दरम्यान, प्रशासनाने बसस्थानकाकडून सावकार कॉलनीकडे जाणाऱया रस्त्यावरील एका साध्या घराचे अतिक्रमण काढण्याबाबत समज †िदली. तर माळगल्ली येथील एका घराचे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे.

 कडलास्कर यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. नगरपालिकेतील काही पदाधिकाऱयांशी संधान बांधून त्यांनी चार महिन्यापासून पेठ-सांगली रस्त्यावरील नगरपालिका हद्दीतील सि.स.नं 743 मधील जागेत सुमारे साडे चार हजार स्के. फुटाचे शेड उभारणीचे काम सुरु होते. ही जागा ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची आहे. सध्या हे काम अंतिम टप्यात आले आहे. कडलासकर यांनी ट्रस्टशी भाडे करार केला आहे. पण नगरपालिकेची शेड उभारणीसाठी परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्यासाठी सत्ताधारी व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांचा आग्रह होता. अखेर सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे शेड हटवावे, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा घरचा आहेर दिला होता. त्यावेळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी कडलासकर यांच्या विरुध्द कारवाई करण्याची ग्वाही दिली होती.

पालिका प्रशासनाने ऑगस्ट 2018 मध्ये कडलासकर यांना हे शेड काढून घेण्याची नोटीस दिली होती. पण, त्यांनी या नोटीसलाही दाद दिली नाही. उलट काम जोमानेच सुरु ठेवले. त्यामुळे दोन्ही गटात कलगीतुरा रंगला होता. पाटील यांच्या सर्वसाधारण सभेतील आक्रमक पवित्र्यानंतर नगररचना अधिकारी एस. एम. कांबळे यांनी कडलासकर विरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. पोलिसांनी भा.द.वि. कलम 447, 188 सह महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 प्रमाणे गुन्हा नोंद केला. या प्रक्रियेनंतर शेड हटवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी पालिकेने केली होती. त्यासाठी पक्षप्रतोद पाटील यांनी पाठपुरावा केला.

जिल्हा पोलीस प्रमुखांनी गुरुवारी रात्री पोलीस बंदोबस्ताचे इस्लामपूर पोलिसांना आदेश दिले. शुक्रवारी सकाळपासूनच पालिका प्रशासनाने गुप्तता बाळगून हे शेड हटवण्याची तयारी केली. नगररचना विभागाचे अधिकारी कांबळे, स्वच्छता आरोग्य विभागाचे अधिकारी साहेबराव जाधव, व अन्य कर्मचारी पोलीस बंदोबस्तात या शेडवर जे.सी.बी. व अन्य यंत्रसामुग्रीसह पोहोचले. दरम्यान पक्षप्रतोद  पाटील, त्यांचे बंधू महेश पाटील, विजय पवार यांनी उभा राहून हे शेड पाडण्यास सुरुवात केली. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व गटनेते आनंदराव पवार यांनी भेट दिली. त्यांनी शहरातील अन्य अतिक्रमणे हटवण्याची अधिकाऱयांना सूचना केली.

टोलेजंग असे पत्र्याचे शेड पाडण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त तात्काळ शहरात पसरले. त्यामुळे नागरीकांनी गर्दी केली. दरम्यान कडलास्कर व त्यांच्या संबंधीतांनी धाव घेतली. तोपर्यंत जे.सी.बी.च्या सहाय्याने समोरील व पाठीमागील बाजूचा छताचा तसेच बाजूचा पत्रा तोडून काढला होता. त्यामुळे कडलास्कर हे पालिकेत मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना भेटले. त्यांनी नुकसान न करता, आपण स्वतःहून हे शेड काढून घेत असल्याचे लेखी व तोंडी सांगितले. पालिकेत चर्चा सुरु असताना ही कारवाई काही वेळ थांबवण्यात आली. शेवटी त्यांना शेडच्या ठिकाणी बोलावून घेऊन त्यांचे व्हिडीओ चित्रण घेण्यात आले. यामध्ये त्यांनी हे शेड लवकरात लवकर काढून घेऊ, त्याच बरोबर रितसर नगरपालिकेची परवानगी घेऊन शेड उभारु, असे सांगितले. त्यामुळे ही अतिक्रमण हटावची मोहीम थांबवण्यात आली. या कारवाईमुळे गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या वादावर पडदा पडला.

तिघांस मुदतवाढ

कडलास्कर यांच्या अतिक्रमणावरील कारवाईमुळे शहरातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱया अन्य अतिक्रमणांवर पालिका प्रशासनाची नजर गेली. बसस्थानकाकडून सावकार कॉलनीकडे नव्याने झालेल्या रस्त्यावर हिबजाबेगम, अब्दुलगणी सय्यद, रफिक बाबालाल शेख व मेहरनिगा सिराज भोंबल यांचे सध्या घराचे अतिक्रमणे आहेत. पालिका व त्यांच्यातील न्यायालयीन वादानंतर हे अतिक्रमणे काढून घेणार असल्याचे त्यांनी लेखी दिले आहे. पालिकेच्या विकास आरखडय़ामध्ये हा रस्ता 40 फुटी दर्शविण्यात आला आहे. त्याच रस्त्यामध्ये घर व दुकान आहे. पालिका प्रशासनाने कर्मचारी व जे.सी.बी. पाठवल्यानंतर या कुटुंबांची धावपळ उडाली. नगरसेवक पीरअली पुणेकर व माजी नगरसेवक आयुब हवालदार यांनी मुख्याधिकारी झिंजाड यांच्या समोर मध्यस्थी केली. या तिन्ही कुटुंबांनी न्यायालयात आमच्या विरुध्द निकाल लागल्याने व अचानक अतिक्रमण हटवण्यासाठी यंत्रणा आल्यामुळे गैरसोय होणार असून थोडया कालवधीच स्वतः अतिक्रमण काढून घेतो, असे लेखी दिले. त्यामुळे ही कारवाई स्थगित करण्यात आली.

शहरातील माळगल्ली परिसरातील दिनकर काळुगडे यांनी ये-जा करण्याच्या छोटया बोळाच्या जागेत पत्र्याच्या घराचे अतिक्रमण केले आहे. या परिसरातील लोकांची अनेक वर्षापासून हे अतिक्रमण हटवण्याची मागणी होती. कडलासकरांच्या अतिक्रमणाच्या निमित्ताने हे अतिक्रमण काढण्यासही मुहूर्त लागला. पालिका प्रशासनाची यंत्रणा पोलीस बंदोबस्तासह सायंकाळी तिकडे रवाना झाली. पण हे घर बोळ रस्त्यात असल्याने जे.सी.बी. पोहचू शकत नव्हता. त्यामुळे कर्मचाऱयांनी कुदळ, पहार, व अन्य साहित्याच्या सहाय्याने भिंत पाडून पत्रे काढण्याचा प्रयत्न केला. पण अंधार होत चालल्याने व यंत्रसामुग्री अपुरी असल्याने हे अतिक्रमण शनिवारी काढण्याचा निर्णय झाला. शहरात श्रेयवादातून अतिक्रमण हटावची ठिणगी पडली असून भविष्यात त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. पालिकेच्या या कारवाईचे शहरवासीयांतून स्वागत होत आहे. पण अतिक्रमणे तोंडे पाहून न हटवता, सरसकट हटवावीत, अशी मागणी त्यांच्यातून होत आहे.

पाटील, पटवेकर यांच्यात वाद

जे.सी.बी.च्या सहाय्याने शेड काढण्याची मोहिम सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मुनिर पटवेकर यांनी धाव घेवून शेड पाडण्यास विरोध केला. दरम्यान महेश पाटील व पटवेकर यांच्यात वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हा वाद मिटला. या कारवाई दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणीच नगरसेवक  फिरकले नाहीत.

चुकीचे काम हाणून पाडू : विक्रम पाटील

या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना पक्षप्रतोद विक्रम पाटील म्हणाले, आम्ही पालिकेचा कारभार पारदर्शक करु, शहरात चुकीचे काम होणार नाही, ही ग्वाही शहरवासीयांना देऊन सत्तेवर आलो आहे. त्यामुळे इथ चुकीचं काहीच होणार नाही. वास्तविक अशा कामांना विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने कडाडून विरोध करायला हवा. पण ते नामानिराळे राहून सत्ताधाऱयांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळत आहेत. या कारवाईने आता कुठे सुरुवात झाली असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला.

अन्य अतिक्रमणेही हटवावीत : शहाजी पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक शहाजी पाटील म्हणाले, आम्ही सभागृह व सभागृहाबाहेर आवाज उठवल्यानेच हे अतिक्रमण हटवावे लागले. मुळात हे अतिक्रमण कसे झाले. याचा शोध सत्ताधाऱयांनीच घ्यावा. तसेच शहरातील अन्य  अतिक्रमणे हटवतानाच शहर वाहतुकीचे नियोजनही प्रभावीपणे करावे.

Related posts: