|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत

अन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत 

प्रतिनिधी/ सातारा

दुष्काळग्रस्तांच्या वेदना काय असतात हे सांगण्यासाठी साताऱयातील 9 वर्षाच्या अन्शुलने शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांना मुजरा करुन सुरु केलेली सजग यात्रा चार दिवसाच्या प्रवासानंतर शुक्रवारी पुन्हा शिवतीर्थावरच छत्रपती शिवरायांना अभिवादन करत पूर्ण झाली. अन्शुलचे दुपारी साताऱयात आगमन झाल्यावर शिवतीर्थावर सातारकरांनी त्याच्या सजग यात्रेचे जंगी स्वागत केले. हार, बुके व फुलांच्या वर्षावात मान्यवरांच्या उपस्थितीत हा कौतुक सोहळा रंगतदार व प्रेरणादायी ठरला.

 ‘चलो मिलकर एक साथ, दुष्काळाशी दोन हात’ असा संदेश देत सायकलवरून मंगळवार 13 नोव्हेंबर रोजी जनजागृती मोहीम अन्शुल पवार याने सुरू केली. अवघ्या 9 वर्षाच्या अन्शुलने कराड, कोल्हापूर (टोप), कागल (कण्हेरी मठ), कर्नाटक बोर्डर पास करून निपाणीपर्यंत पोहोचला. सजग यात्रा पूर्ण करुन शुक्रवारी अन्शुल पवार आपले वडील प्रशांत पवार यांच्यासह साताऱयात परतल्यानंतर त्यांचे सातारकरांच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले.

  यावेळी तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, नायब तहसीलदार अमर रसाळ, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, तरुण भारतचे आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर, धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. रविंद्र भोसले, उपअभियंता सुलाखे, उद्योजक अमित जोशी, अमर शिंदे, डॉ. अनिल जोशी, समीर बागवान, राजेंद्र शिंदे, प्रदीप भोसले, रामराजे माने देशमुख, चंद्रकांत शिंदे, राहूल पवार, सुषमा पाटील, स्वाती साबळे, मनोहर पटेल, विनोद सूर्यवंशी, सुदाम साळुंखे सर, सुनील साबळे, संजय आढाव, विनोद साबळे, विठ्ठल शिंदे, अमर रसाळ आदींसह अद्वैत प्रभावळकर मित्रपरिवार मोठय़ा संख्येने उपस्थित होता.

    ‘तरुण भारत’चे आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर यांनी उपस्थितांना अन्शुलने केलेल्या दुष्काळग्रस्तांसाठी केलेल्या या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, डॉ. रविंद्र भोसले, राजेंद्र चोरगे यांनी अन्शुलने अल्पवयात सामाजिक भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. लहान वयात एवढय़ा सजगपणे अन्शुलने सायकल चालवत ही यात्रा पूर्ण केली आणि त्याच्यासोबत राहून प्रशांत पवार यांनी मुलाला दिलेले प्रोत्साहनही सर्व पालकांसाठी प्रेरणादायी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

सातारा ते निपाणीपर्यंत केला जागर

  जिह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील लोकांना मदतीची गरज आहे. सोशल मिडियावर या दुष्काळग्रस्तांची टिंगल उडवण्यात येते ती बंद व्हावी. या परिस्थितीमुळे त्या भागातील लोकांनी खचून जावू नये, या दुष्काळग्रस्तांसाठी लोकसहभागतून लढा उभारण्यात यावा हा संदेश देण्यासाठी मंगळवार दि. 13 नोव्हेंबर पासून साताऱयातून सायकल यात्रा करणाऱया 9 वर्षाच्या अन्शुलने कराड, कोल्हापूर (टोप), कागल (कण्हेरी मठ), कनार्टक बोर्डर पास करून निपाणी कनार्टक बोर्डर येथे आपला प्रवास थांबवला.

शेकडो नागरिकांशी साधला संवाद

  गेली चार दिवसांपासून आईपासून दूर रहात दुष्काळग्रस्तांच्या वेदना मांडण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यासाठी ही सायकल रॅली काढली होती. या जनजागृती मोहीमेत त्याने या सायकलवरील प्रवासात शेकडो नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. ’चलो मिलकर एक साथ, दुष्काळाशी दोन हात’ असा प्रेरणा देणारा संदेश लिहिलेल्या पत्रकांचे वाटप करताना अल्पवयात असलेल्या अन्शुलच्या सामाजिक भावनेचे सजग यात्रा मार्गावर नागरिकांकडून कौतुक होत होते.

वडील होते साथीला….. 

   अन्शुलच्या या तीन दिवसांच्या अनोख्या सायकल रॅलीत त्याचे वडील प्रशांत पवार यांनी त्याला साथ दिली. अन्शुलचे वय केवळ 9 वर्षे पण या वयात सायकल प्रवास करण्याचे त्याने ठरवले. त्याला प्रशांत पवार यांनी बळ दिले. आईपासून, घरापासून कधीही दूर न राहणारा अन्शुल वडिलांच्या साथीने व मनातील प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर सायकल चालवत राहिला आणि सजग यात्रा यशस्वी केली. अन्शुल आणि प्रशांत पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवासात येणारे अनुभव अनशुलने व्यक्त करतानाच दुष्काळग्रस्तांना मदतीचे आव्हान करण्याचे काम सर्वांना केले.

तरुणभारत होता पाठीशी….

अन्शुलने सजग यात्रेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांच्या व्यथा, वेदना मांडण्याचे ठरवल्यानंतर तरुणभारतचे आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर यांनी व तरुणभारत आम्हाला क्षणोक्षणी पाठबळ दिले. आमचा प्रत्येक क्षण टिपत अन्शुलच्या सजग यात्रेचा वृत्तांत हजारो वाचकांपर्यंत पोहोचवला. याबद्दल प्रशांत पवार व अन्शुलने देखील तरुणभारतचे शिवतिर्थावर झालेल्या स्वागत सोहळय़ात जाहीर आभार व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी तरुणभारतच्या अशा विधायक उपक्रमांना बळ देण्याच्या भूमिकेचे अभिनंदन केले.

Related posts: