|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावर तस्करीचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर तस्करीचे सोने जप्त 

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर गुरुवारी पुन्हा तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. कस्टम विभागाच्या दाबोळीतील तज्ञ पथकाने ही कारवाई केली. सहा प्लास्टिक पॅकेटमध्ये बंद असे पावडरयुक्त सोने या पथकाच्या हाती लागले. 450 ग्रॅम वजनाची ही सोन्याची पावडर आखाती देशातून भारतात आणण्यात आली होती. मात्र, त्याचा प्रयत्न फसला. या सोन्याचे मूल्य निश्चित झालेले नाही.

दाबोळी विमानतळावरील कस्टमच्या तज्ञ पथकाला आपल्या नियमित तपासणीच्यावेळी एका प्रवाशाबाबत संशय आल्याने त्यांनी या प्रवाशाच्या बॅगांची कसून तपासणी केली असता एका बॅगेत सहा प्लास्टिक बंद पाकिटात सोने मिश्रित पावडर आढळून आली. सदर पावडर 450 ग्रॅज वजनाची होती. अधिकाऱयांनी हे सोने जप्त करून त्या प्रवाशालाही ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. ओमान एअर फ्लाईट क्र. डब्ल्यूव्हाय – 0207 विमानातून हा प्रवासी दाबोळी विमानतळावर दाखल झाला होता. त्या पावडरमधून निव्वळ सोन्याची पावडर वेगळी केल्यानंतरच सोन्याची किंमत निश्चित होणार आहे.

साहाय्यक कस्टम आयुक्त दीपक गवई यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक कस्टम आयुक्त श्रीमती टी. आर. गजलक्ष्मी यांनी ही कारवाई केली. कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.