|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱयांचे आंदोलन मागे

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱयांचे आंदोलन मागे 

मुख्यमंत्री सोमवारी घेणार बेळगावात बैठक

प्रतिनिधी/ बेळगाव

थकित असलेली ऊस बिले, नवीन ऊस दर जाहीर करणे यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले होते. हे आंदोलन गुरुवारपासून सुरू झाले आहे. शुक्रवारी तर शेतकऱयांनी या आंदोलनाची धार आणखी वाढविली. काही शेतकऱयांनी चक्क झाडावर आणि टॉवरवर चढून गोंधळ घातला. यामुळे याची दखल मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी घेतली. त्यांनी तातडीने शेतकऱयांशी संपर्क साधून सोमवारी बैठक घेण्यात येईल, तेव्हा तुम्ही आंदोलन मागे घ्या, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱयांनी आंदोलन मागे घेतले.

जिह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस बिले दिली नाहीत. यासाठी गेल्या वर्षभरापासून शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलने केली. तरी देखील ऊस बिले देण्यात आली नाहीत. या ऊस बिलाच्या राजकारणातूनच तत्कालीन जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांची बदली देखील झाली होती. त्यानंतर नूतन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी शेतकऱयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आले. शेतकऱयांनी त्यांच्या विरोधातही आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या.

प्रादेशिक आयुक्त कार्यालयालाही टाळे ठोकण्याचा प्रयत्न

गुरुवारपासून रात्री व शुक्रवार पहाटेही शेतकऱयांनी आंदोलन तीव्र केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून ये-जा करणेही साऱयांनाच अवघड केले. शेतकऱयांच्या या भूमिकेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकलेच नाही. याचबरोबर प्रादेशिक आयुक्त कार्यालयालाही टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हा पंचायतीचे कामकाजही बंद पाडण्याचा शेतकऱयांनी प्रयत्न केला होता.

टॉवरवरच आंदोलन

शेतकरी पाण्याच्या टँकरखाली अर्धनग्न होऊन झोपले. एकूणच आंदोलनाची धार शेतकऱयांनी शुक्रवारी वाढविली होती. प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला लागूनच एक टॉवर आहे. त्या टॉवरवरच एक शेतकरी चढला. यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर एक शेतकरी झाडाच्या टोकावर चढून बसला. त्याला खाली उतरविण्यासाठी इतर शेतकरी व पोलिसांनीही विनवणी केली. त्यानंतर तो शेतकरी खाली उतरला.

जिल्हाधिकाऱयांची बदली करा

दिवसभर शेतकरी भर उन्हात अर्धनग्न होवून बसले होते. यावेळी ते जिल्हाधिकाऱयांची बदली करावी, अशी मागणी करत होते. साखर आयुक्तांनी दिशाभूल केली आहे. त्यामध्ये जिल्हाधिकाऱयांचाही समावेश असल्याचा आरोप शेतकरी करत होते. कोणत्याही परिस्थितीत जिल्हाधिकाऱयांची बदली करावी, अशी मागणी शेतकरी करत होते. महत्त्वाचे म्हणजे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या साखर कारखान्याने ऊस बिले देणे बाकी असताना त्या कारखान्याने ऊस बिल द्यायचे बाकी नाही, असे जिल्हाधिकारी सांगत आहेत. त्यावरुन जिल्हाधिकारी हे पालकमंत्र्यांच्या आदेशावरुनच काम करत आहेत, असा आरोप शेतकऱयांनी केला.

 आंदोलनाचा दैनंदिन कामावरही परिणाम

आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या रस्त्यावरील वाहतूक अडविण्यासाठी पोलिसांनी दोन्ही ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. आंदोलनाचा दैनंदिन कामावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. या आंदोलनाला वकिलांबरोबरच इतर संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला होता.

सायंकाळी मुख्यमंत्र्यांना या आंदोलनाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी शेतकऱयांशी संपर्क साधला. मी शेतकऱयांच्या बाजूनेच आहे. शेतकऱयांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष घालण्यास तयार आहे. तरी शेतकऱयांनी हे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. बेंगळूर येथे बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र शेतकऱयांनी बेळगावमध्येच बैठक घ्यावी, अशी मागणी केली. त्यावर तातडीने सोमवारीच बैठक घेण्यात येईल तसेच तोडगा काढण्यात येईर, असे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱयांनी आंदोलन मागे घेतले आहे.

 शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे शेतकऱयांनी सांगितले.

Related posts: