|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चौपदरीकरणाला लाभणार हिरवी किनार

चौपदरीकरणाला लाभणार हिरवी किनार 

एक कि. मी. अंतरापर्यंत खासगी जागेत वृक्ष लागवड

सामाजिक वनीकरण करणार अंमलबजावणी

कुडाळ, कणकवली तालुक्यातून 126 प्रस्ताव प्राप्त

हायवेसाठी झाडांची मोठय़ा प्रमाणात तोड

दोन लाख रोपांची नव्याने करणार लागवड

अडीच कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित

इच्छुक शेतकऱयांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पद्माकर वालावलकर / कुडाळ:

 मुंबई-गोवा महामार्गापासून एक कि. मी. अंतरापर्यंत खासगी जागेत वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱयांकडून कुडाळ तालुक्यातून 86, तर कणकवली तालुक्यातील 40 प्रस्ताव सामाजिक वनीकरण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्राप्त प्रस्तावांद्वारे 50 हजार रोपांची लागवड केली जाणार असून त्यासाठी 2 कोटी 53 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान अपेक्षित आहे.

 कुडाळ व कणकवली तालुक्यात महामार्ग चौपदरीकरणासाठी दुतर्फा असलेली 50 ते 60 हजार झाडे तोडण्यात आली. त्याबदल्यात दोन लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. महामार्गाच्या मध्यबिंदूपासून दुतर्फा एक कि. मी. अंतरापर्यंतच्या खासगी पडिक जमिनीवर ही लागवड करण्यात येणार आहे. या लागवडीबाबतची अंमलबजावणी सामाजिक वनीकरण यंत्रणेकडून राबविली जात आहे. या लागवडीसाठी इच्छुक शेतकऱयांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

फळ, जंगली झाडांचा समावेश

 साग, बांबू, काजू, आवळा, जांभूळ, आंबा, फणस, शेवगा, ताड, सुरू, शिवण, बाभुळ, कडीपत्ता अशा फळ व जंगली झाडांचा या लागवडीमध्ये समावेश आहे. रोपांच्या तीन वर्षांच्या लागवडीसाठी येणारा खर्च शेतकऱयाला प्रतिरोप 507 रुपये अनुदान दिले जाणार आहे. महामार्गालगत कुडाळ तालुक्यातील 18, तर कणकवली तालुक्यातील 22 गावे आहेत. कुडाळ तालुक्यातील 86 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. 1 कोटी 15 लाख 74 हजार 280 रुपये अनुदान अपेक्षित आहे, तर कणकवली तालुक्यातून 40 प्रस्ताव प्राप्त आहेत. त्यासाठी 1 कोटी 37 लाख 75 हजार 720 रु. अनुदान अपेक्षित आहे.

जिल्हा प्रशासनामार्फत लागवडीसाठी अनुदान 

 तालुका सामाजिक वनीकरण विभागाकडून जिल्हा वनीकरण विभागाकडे हे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. दोन्ही तालुक्यातील 126 प्रस्तावांनुसार 50 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत या लागवडीकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्रशासनाने राखून ठेवला आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकऱयांनी आपले प्रस्ताव सामाजिक वनीकरण विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

खासगी जागेत होणारा लागवड

चौपदरीकरणासाठी दुतर्फा असलेली झाडे तोडण्यात आली तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त झाडांची लागवड करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महामार्गालगतच्या खासगी जागेत ही लागवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.