|Friday, May 24, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत अ संघाचा डाव 8/467 वर घोषित

भारत अ संघाचा डाव 8/467 वर घोषित 

वृत्तसंस्था/ माऊंट मौंगानुई

पार्थिव पटेलने सर्वाधिक 94 धावांची तडफदार खेळी साकारल्यानंतर भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघाविरुद्ध अनधिकृत पहिल्या कसोटीत आपला पहिला डाव 8 बाद 467 धावांवर घोषित केला. पण, नंतर न्यूझीलंड अ संघाच्या फलंदाजांनीही आक्रमक सुरुवात करत भारत अ च्या गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. दुसऱया दिवसअखेर न्यूझीलंड अ संघाने 1 बाद 140, असे चोख प्रत्युत्तर दिले होते.

या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय संघाने दुसऱया दिवशी 5 बाद 340 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात करताना आक्रमक पवित्रा कायम राखला. बे ओव्हलवरील या सामन्यात मध्यमगती गोलंदाज ब्लेयर टिकनेर सर्वाधिक किफायतशीर ठरला. त्याने 40 धावात 5 बळी घेतले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने जोरदार सुरुवात केली, त्यात माजी किवीज कर्णधार केन रुदरफोर्डचा चिरंजीव हमिश रुदरफोर्ड याच्या 169 चेंडूतील 106 धावांचा वाटा मोलाचा ठरला. त्याच्या खेळीत 16 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. त्याचा सहकारी सलामीवीर विल यंगने देखील 49 धावांचे योगदान दिले. ऑफस्पिनर कृष्णप्पा गौतमने त्याला बाद करत डोकेदुखी ठरणारी ही जोडी फोडली.

मोहम्मद सिराज व गौतम यांनी बरीच गोलंदाजी केली. मध्यमगती गोलंदाज दीपक चहर बराच निष्प्रभ ठरला. तत्पूर्वी, अनुभवी पार्थिव पटेलचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले. टिकनेरने त्याला 94 धावांवर बाद केले. टिकनेरनेच त्यापूर्वी मुरली विजय व मायंक अगरवाल यांचेही बळी घेतले होते. अर्थात, पार्थिव पटेल बाद झाल्यानंतरही भारतीय फलंदाजांचा धावांचा धमाका सुरुच राहिला. विजय शंकरने 96 चेंडूत 62 धावांची खेळी साकारली तर 47 धावांसह गौतमने देखील समयोचित योगदान दिले.

या अनधिकृत कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी मुरली विजय व अजिंक्य रहाणे प्रभावशाली खेळी साकारु शकले नाहीत. ते अनुक्रमे 28 व 12 धावांवर बाद झाले. मात्र, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी व मायंक अगरवाल यांनी शानदार अर्धशतके झळकावत निवड समितीचे नव्याने लक्ष वेधून घेतले आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत अ पहिला डाव : 122.1 षटकात 8/467 घोषित. (पार्थिव पटेल 136 चेंडूत 94, हनुमा विहारी 150 चेंडूत 86, पृथ्वी शॉ 88 चेंडूत 62, विजय शंकर 96 चेंडूत 62, कृष्णप्पा गौतम 73 चेंडूत 47. अवांतर 11. ब्लेयर टिकनेर 4/80).

न्यूझीलंड अ पहिला डाव : 55 षटकात 1/176 (हमिश रुदरफोर्ड 169 चेंडूत 16 चौकार, 1 षटकारासह नाबाद 106, विल यंग 104 चेंडूत 8 चौकारांसह 49, सेफर्ट नाबाद 13. अवांतर 8. कृष्णप्पा गौतम 1/33).

Related posts: