|Thursday, May 23, 2019
You are here: Home » क्रिडा » एकमेव टी-20 सामन्यात द.आफ्रिकेची बाजी

एकमेव टी-20 सामन्यात द.आफ्रिकेची बाजी 

पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया 21 धावांनी पराभूत

वृत्तसंस्था/गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया)

येथे झालेल्या एकमेव टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी विजय मिळवला. पावसाचा व्यत्यय आलेला हा सामना प्रत्येकी 10 षटकांचा खेळवण्यात आला. प्रारंभी, द.आफ्रिकेने 10 षटकांत 6 बाद 108 धावा जमवल्या. प्रत्युतरातदाखल खेळताना यजमान ऑस्ट्रेलियाला 7 बाद 87 धावापर्यंतच मजल मारता आली. द.आफ्रिकन गोलंदाज तबरेज शाम्सीला शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, मायदेशातच ऑस्ट्रेलियाला द.आफ्रिकेकडून वनडे व टी-20 मालिकेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

सामन्याच्या प्रारंभापासूनच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हा सामना प्रत्येकी 10 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना द.आफ्रिकेकडून डिकॉक व रजा हेंड्रीक्स यांनी 42 धावांची सलामी दिली. डिकॉकने 22 तर हेंड्रीक्सने 19 धावा फटकावल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार डु प्लेसिसने 4 चौकारासह 27 धावांचे योगदान दिले. पण त्यालाही मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. हेन्री क्लासेन (12) व डेव्हिड मिलर (11) धावा करत संघाला शतकी मजल मारुन दिली. अखेरच्या दोन षटकांत फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात मात्र आफ्रिकन फलंदाजांनी विकेट टाकल्यामुळे त्यांना 10 षटकांत 6 बाद 108 धावापर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून कोल्टर नाईल व टाए यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

आफ्रिकन गोलंदाजासमोर आफ्रिकेची दाणादाण

प्रत्युतरातदाखल खेळताना द.आफ्रिकन गोलंदाजासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडाली. विजयासाठीच्या 109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑसी संघाला 10 षटकांत 7 बाद 87 धावापर्यंतच मजल मारता आली. ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 23 चेंडूत 38 धावा केल्या. ख्रिस लिनने 14 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना मात्र दुहेरी आकडाही गाठता आला नाही. द.आफ्रिकेतर्फे एन्गिडी, ख्रिस मॉरिस व पेहलुकवियो यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत विजयात मोलाची भूमिका बजावली.

मायदेशात द.आफ्रिकेविरुद्ध वनडे व टी-20 मालिका गमवावी लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 21 पासून भारताबरोबर टी-20 मालिकेला सामोरे जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका 10 षटकांत 6 बाद 108 (डिकॉक 22, हेंड्रीक्स 19, डु प्लेसिस 27, क्लासेन 12, टाए 2/18, कोल्टर नाईल 2/19).

ऑस्ट्रेलिया 10 षटकांत 7 बाद 87 (ख्रिस लिन 14, ग्लेन मॅक्सवेल 38, एन्गिडी 2/16, मॉरिस 2/12, पेहलुकवियो 2/21, शाम्सी 1/12).

 

Related posts: