|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दैव बलवत्तर म्हणून 15 प्रवासी बचावले

दैव बलवत्तर म्हणून 15 प्रवासी बचावले 

वार्ताहर/  अथणी

चालकाचा ताबा सुटल्याने बस अथणी-कागवाड राज्यमार्गावरील मुरगुंडीजवळच्या कृषीहोंडा तळय़ात कोसळल्याची दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. केवळ दैल बलवत्तर म्हणून बसमधील 15 प्रवासी बचावले आहेत. सदर घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केल्याने मोठी जीवितहानी टळली. त्वरित जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अनुराधा, रवींद्र पुजारी (वय 35 रा. तासगाव, जि. सांगली), अंजना लांडगे (वय 25 रा. कागवाड), संदीप पुजारी (रा. तासगाव), हिना निस्तार (वय 30 रा. विजापूर, चंद्रव्वा तेली (वय 40 रा, चमकेरी), बजरंग यलमळी (वय 30 रा. अथणी), राजेंद्र केंचान्नावर (वय 28 रा. आढहळ्ळी), रोहित तेली (वय 30 आढहळ्ळी), मुतव्वा गोविंदापगोळ (वय 45 रा. गोठे, ता. जमखंडी), चैत्रा गोविंदप्पागोळ (रा. गोठे, ता. जमखंडी), मौलाना ननी (वय 50 रा. नदीइंगळगाव), चन्नाप्पा चन्नानावर (वय 50 रा. नदीइंगळगाव), मुरग्याप्पा हेगडे (वय 50 रा. नदीइंगळगाव), राघवेंद्र हारुगेरी (वय 35 रा. कटगेरी), शामराव इस्माईल (वय 42 रा. अथणी), बबिता सिकलगार (वय 30 रा. अथणी), चालक प्रकाश कंटेकर (रा. शिरुर), वाहक भिमाप्पा बिरादार (रा. मुद्देबिहाळ) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी, राज्य परिवहन मंडळाची बस क्र. (केए 42 एफ 1685) अथणीहून मिरजकडे जात होती. दरम्यान, अथणी शहराबाहेरील कृषीहोंडा तळय़ाजवळ बस येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस तळय़ात कोसळली. बस तळय़ात कोसळताच प्रवाशांची एकच आरडाओरड सुरू झाली. सदर घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना तत्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली. यामुळे जीवितहानी टळली. या घटनेत 15 प्रवासी जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अथणीचे सीपीआय एच. शेखराप्पा, उपनिरीक्षक यु. बी. आवटी यांनी भेट देऊन पाहणी केली. जखमींना तत्काळ अथणी शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. अधिक उपचारासाठी काहींना मिरज येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनेची नोंद अथणी पोलिसात झाली आहे. घटनेबाबत अथणीचे आगारप्रमुख पांडूरंग किरणगी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अपघात कसा घडला याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर योग्यती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

पाणी अधिक असते तर…

तळय़ात जर काठोकाठ पाणी असते अनेक प्रवाशांचा पाण्यात गुदमरुन मृत्यू झाला असता. तळय़ात पाणी कमी असण्याबरोबरच बस एका बाजूला उलटली. जर बस पूर्णपणे उलटी झाली असती तरीही मोठी दुर्घटना झाली असती. केवळ दैव बलवत्तर आणि नजीकचे नागरिक व अन्य वाहनधारकांनी त्वरित मदत केल्याने जीवितहानी टळल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

Related posts: