|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हायकमांडने ठरविले तर मुख्यमंत्री होण्यास तयार

हायकमांडने ठरविले तर मुख्यमंत्री होण्यास तयार 

उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची माहिती

प्रतिनिधी/ बेळगाव

काँग्रेस हायकमांडने ठरविले तर मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याची आपली तयारी आहे, अशी कबुली उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. राज्य राखीव दलाच्या जवानांच्या पथसंचलनानंतर पोलीस परेड मैदानावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. कोणावर कोणती जबाबदारी द्यावी, याचा निर्णय हायकमांडच घेईल, असे सांगत परमेश्वर यांनी काँग्रेसमधील आपल्या विरोधकांवर पलटवार केला आहे.

माजी मंत्री दिनेश गुंडूराव यांच्यावर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर डी. के. शिवकुमार हेच पुढचे मुख्यमंत्री असे बिंबविण्यात येत आहे. याकडे पत्रकारांनी परमेश्वर यांचे लक्ष वेधले असता, कोणावर कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय हायकमांडच घेणार आहे. युती सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्यावर उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याआधी आपल्या नेतृत्वाखाली पक्ष कर्नाटकात दोनवेळा विधानसभांना सामोरे गेला.

युती सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सरकार कोसळणार? असा अपप्रचार भाजप नेत्यांनी चालविला आहे. ते चुकीचे आहे. तीन लोकसभा व दोन विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर युती आणखी मजबुत झाली आहे. त्यामुळे पाच वर्षे पूर्ण करणार असा विश्वास आहे, असे परमेश्वर यांनी सांगितले. चालू महिन्याअखेर मंत्रीमंडळ विस्तार व महामंडळांवर नियुक्त्या होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाच हजार पोलीस निवृत्त

दरवषी तीन ते पाच हजार पोलीस निवृत्त होतात. कर्नाटक पोलीस दलात सव्वालाखाच्या घरात मनुष्यबळ आहे. सेवानिवृत्तीनंतर दरवषी पाच हजार जागा रिक्त होतात. त्यामुळे दरवषी त्या भरण्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येकवेळेला पोलीस भरतीसाठी सरकारची अनुमती लागत होती. आता दर पाच वर्षांतून एकदा अनुमती घ्यावी लागणार आहे. तशी तरतूद करण्यात आली आहे.

कर्नाटकात 12 कायमस्वरुपी व 22 तात्पुरती पोलीस प्रशिक्षण केंद्रे आहेत. या केंद्रात सातत्याने प्रशिक्षणाचे कार्य चालते. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. याबरोबरच पोलिसांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही सरकारने उपाययोजना केल्या आहेत, असे जी. परमेश्वर यांनी सांगितले.

चौकट करणे

राघवेंद्र औरादकर समितीचा अहवाल

वेतनवाढीसाठी दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. याकडे पत्रकारांनी गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले असता राघवेंद्र औरादकर समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या शिफारशींनुसार 2 हजार रुपये भत्ता दिला जातो. उर्वरित शिफारशींची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मुख्यमत्र्यांनीही मान्यता दिली आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

चौकट करणे

आठवडय़ाभरात आयजीपींची नियुक्ती

बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक अलोककुमार यांची दोन महिन्यांपूर्वी बेंगळूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यानंतर हे पद अद्याप रिक्त आहे. याकडे पत्रकारांनी गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले असता येत्या आठवडय़ाभरात उत्तर विभागासाठी नव्या आयजीपींची नियुक्ती करण्यात येणार आहे. बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालय उभारणीसाठीही अधिवेशनाच्या काळात पायाभरणी कार्यक्रम होणार आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

Related posts: