|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चार भिंतींमध्ये स्वत:ला कोंडून घेऊ नका!

चार भिंतींमध्ये स्वत:ला कोंडून घेऊ नका! 

बेळगाव/ प्रतिनिधी

चार भिंतींमध्ये स्वत:ला कोंडून घेऊ नका. खिडकीतून अंगण दिसेल, अंगणातून रस्ता दिसेल, रस्त्यावरून मैदान दिसेल, मैदानात पोहोचलात की संपूर्ण जग दिसेल. त्यामुळे आपले विचार व दृष्टी व्यापक ठेवा. मनात जे येईल ते लिहा, प्रसिद्धीची घाई करू नका, लिहिताना भावनांना प्राधान्य द्या. एक दिवस तुमचे लेखन क्रांती घडवेल, आणि तुम्ही उत्तम कवि व लेखक म्हणून ओळखले जाल, असा सल्ला आप्पाजी रामचंद्र कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सालाबादप्रमाणे वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे आयोजित अठरावे बाल साहित्य संमेलन गोगटे रंग मंदिर येथे पु. ल. देशपांडे साहित्यनगरीत शनिवारी उत्साहात पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष सी. वाय. पाटील, किरण पाटील, प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, प्रबोधिनीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव सुभाष ओऊळकर, बक्षीस समारंभाच्या पाहुण्या अनुराधा गंगोली, तसेच साठे प्रबोधिनी आयोजित व्याकरण स्पर्धेतील सातवी व दहावी इयत्तेच्या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थिनी मयुरी तांबे व साक्षी पाटील आदी उपस्थित होत्या.

संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. मराठी विद्यानिकेतनपासून ही ग्रंथदिंडी निघाली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन किरण पाटील यांच्या हस्ते झाले. पालखी समवेत ढोलताशाचा गजर करत लेझिमसह मराठमोळा पोषाख करून विद्यार्थी उत्साहाने पालखीत सहभागी झाले होते. सर्व मान्यवरांसमवेत गोगटे रंगमंदिरपर्यंत ग्रंथदिंडी  आली.

मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व मराठी अभिमान गीत सादर केले. त्यानंतर गोविंद केळकर, अजित वाडेकर, यशवंत देव, कविता महाजन, अटलबिहारी वाजपेयी, लालन सारंग या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मयुरी तांबे, वैष्णवी कडोलकर, चंद्रवदन अनगोळकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. आर्या गायकवाड हिने अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. यानंतर आप्पाजी कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. सी. वाय. पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आप्पाजी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संमेलनाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

सत्र दुसरे- कथाकथनाच्या दुसऱया सत्रात विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम कथा उत्कृष्टपणे सादर केल्या. यामध्ये सोहम शहापूरकर, समृद्धी पाटील, पूजा धर्माधिकारी, अमोल सुतार, आर्या गायकवाड, वैष्णवी चिंगळी यांनी कथा सादर केल्या. कथेचा आशय समजून घेऊन विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. त्यांची सादरीकरणाची पद्धत, भाषेतील चढउतार, संवादफेक पाहता त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन शैलजा मत्तीकोप यांनी केले.

सत्र तिसरे- कविसंमेलनाच्या तिसऱया सत्रात वीसहून अधिक बालकवींने आईबाप, पर्यावरण, प्लास्टिक मुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या, शिक्षण, सावित्रीच्या लेकी, सांज, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवराय अशा विविध विषयांवर कविता सादर केल्या. त्यांनी निवडलेले विषय पाहता विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती अचूक आहे हे जाणवले. या सत्राचे सूत्रसंचालन कवि अशोक अलगोंडी यांनी केले.

अध्यक्षीय भाषण

मराठी भाषेला सोळाशे वर्षाची परंपरा आहे. मुकुंद राय यांचा ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ आणि ‘ज्ञानेश्वरी’ हे दीपस्तंभासारखे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. अशा वैभवशाली भाषेचा आणि पूर्वसुरींच्या महान परंपरेचा जागर करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत संमेलनाध्यक्ष सी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.

मराठी भाषेच्या इतिहासाचा धांडोळा त्यांनी घेतला. ते म्हणाले, ब्रिटिश काळात इंग्रजी भरात असताना नाना जगन्नाथ शेठ यांनी वैद्यकीय शिक्षण मराठीत द्या, अशी मागणी केली. माटे, आगरकर, सहस्त्रबुद्धे, फाटक, वाळिंबे, अत्रे असे अनेक दिग्गज मराठी साहित्यिक होऊन गेले. सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ चालवली. चिपळूणकरांनी निबंध वाङ्मय समृद्ध केले. बाबा पदमजी ते विश्वास पाटील, ह. ना.आपटे ते सानिया, सुर्वे, पवार, खराडे या सर्वांनी कादंबरी, कथा, दलित साहित्य समृद्ध केले. या साहित्याचा सुगंध सदैव दरवळत राहावा, यासाठी वि. गो. साठे प्रबोधिनीचे संमेलन प्रयत्नशील राहिले आहे.

मुलांचे वाचन कमी झाले हा आरोप होतो आहे. परंतु अभ्यास आणि वाचन याच्यामध्ये खेळ येतो हे लक्षात घ्या. शाळेतील वाचन हे दुर्दैवाने गुणांशी निगडीत असलेल्या परीक्षा पद्धतीपुरते मर्यादित झाले आहे. पालक खऱया अर्थाने सुशिक्षित असतील तर त्यांनी मुलांना यंत्र नव्हे तर संस्कारक्षम माणूस करावे, आपल्याला दगडाचा समाज नको असेल तर वाचन केले पाहिजे, कारण पुस्तकांची श्रीमंती चिरंतन असते, असे सांगून यांनी अध्यक्षीय भाषणाचा समारोप केला.

यानंतर प्रबोधिनीने घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना अनुराधा गंगोली यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन शितल बडमंजी यांनी केले. आभार प्रदर्शन गजानन सावंत यांनी केले.

Related posts: