|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गडनदी-झारापपर्यंतचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण

गडनदी-झारापपर्यंतचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण 

अर्धवट पुलांच्या कामासाठी नव्याने निविदा : नवीन पूलही वाहतुकीस खुला होणार, नंतर जुना पूल पाडणार!

पुरवणी निवाडय़ाची रक्कम प्राप्त होण्यास सुरुवात!

वार्ताहर / कणकवली:

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत ज्या पुलांची कामे अर्धवट स्थितीत आहेत, त्या जानवली, कसाल, वेताळबांबर्डे पुलांच्या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आल्या आहेत. जुन्या एजन्सीने ही अर्धवट कामे पूर्ण न केल्याने नवीन एजन्सीमार्फत कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. येथील गडनदी पुलावर गर्डर्स बसविण्याचे काम दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार असून डिसेंबर अखेरपर्यंत नवीन तीन पदरी पूल वाहतुकीस खुला होणार आहे. येथील जुने ब्रिटीशकालीन पूल त्यानंतर पाडण्यात येणार असून त्याच्या जागी तीन पदरी पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी दिली. डिसेंबर अखेरपर्यंत गडनदी ते झारापपर्यंतच्या चौपदरीकरणाच्या दोन्ही लेनचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वेगात सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत गेले दोन दिवस शहरातील अनेक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. दिलीप बिल्डकॉनच्या पाच पोकलॅनमार्फत शहरात युद्धपातळीवर रात्रंदिवस काम सुरू आहे. गडनदीच्या नव्याने बांधलेल्या पुलावर शनिवारी रात्रीपासून तेथेच तयार केलेले गर्डर्स बसविण्याचे काम हाती घेतले होते. शनिवार रात्री चार, तर रविवारी दिवसभर अत्याधुनिक क्रेनच्या गर्डर्स बसविण्यात येत होते. या नवीन पुलाला पाच गाळे असून प्रत्येक गाळ्य़ावर 4 गर्डर्स याप्रमाणे एकूण 20 गर्डर्स असणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर त्यावर स्लॅब येणार आहे.

डिसेंबरअखेरीस नवीन पूल वाहतुकीस खुला झाल्यावर जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात जुना पूल पाडून त्या जागी नवीन तीन पदरी पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. भंगसाळ, बेलनदीवरील नवीन पुलांचे गर्डर्स बसविण्याचे काम काम पूर्ण झाले असून पीठढवळ नवीन पुलाचे स्लॅब पूर्ण झाले आहे. गेले वर्षभर काम बंद असलेल्या जानवली, कसाल व बांबर्डे पुलाची कामे पावसाळ्य़ापर्यंत पूर्ण करून त्यावरून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या पुलांच्या एजन्सीनी ही कामे अर्धवट स्थितीत टाकल्याने निविदा काढण्यात आल्या आहेत.

शहरातील बाधीत इमारती पाडण्याचे काम सुरू असताना सर्व्हिस रोड तयार करण्याच्यादृष्टीने काम युद्धपताळीवर सुरू आहे. 45 मीटर जागा ही अक्षांश, रेखांशनुसार निश्चित केल्याने त्यानुसार आराखडय़ाप्रमाणे काम करण्यात येणार आहे. आतापर्यंत पूर्वीच्या आराखडय़ाप्रमाणे जागा बदलण्यात आली नसल्याचे शेडेकर यांनी स्पष्ट केले. संपादित जागेच्या उर्वरित पुरवणी निवाडय़ाचे पैसे येण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार ते काला (भूसंपादन संस्था) मार्फत वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे जी जागा, मालमत्ता, घरे आदी बाधीत होणार त्या सर्वांना मोबदला देण्यात येणार आहे.

पूल, मोऱयाही सहापदरी

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात सुरू असलेल्या मोऱया, पूल, कणकवली शहरातील फ्लायओव्हर ब्रीज ही सहा पदरी रस्त्याच्या अनुषंगाने करण्यात येत आहेत. सर्वच ठिकाणी हायवेचे नियम पाळत काम सुरू असल्याचे शेडेकर म्हणाले.

स्थगिती आदेश प्राप्त नाहीत!

शहरातील काही इमारती पाडण्यासाठी न्यायालयाने स्थगिती दिली असल्याची चर्चा गेले दोन दिवस शहरात सुरू आहे. याबाबत शेडेकर यांना विचारले असता, त्यांनी अद्याप न्यायालयाकडून स्थगिती आदेश प्राप्त नसल्याचे स्पष्ट केले.