|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तिलारीचे गोव्याचे पाणी रोखणार

तिलारीचे गोव्याचे पाणी रोखणार 

दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांचा इशारा : कालवाबाधित ग्रामस्थांना आधी योग्य सुविधा द्या!

वार्ताहर / दोडामार्ग:

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या हद्दीतून गेलेल्या तिलारी प्रकाल्पाच्या डाव्या कालव्याची स्थिती न सुधारल्यास व कालवाबाधित ग्रामस्थांना योग्य त्या सोयीसुविधा न दिल्यास तिलारीचे पाणी गोव्याला कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही, असा इशारा कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी दिला. रविवारी त्यांनी शहरातून गेलेल्या कालव्याची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमानचे शहरअध्यक्ष दादा बोर्डेकर, सुनील म्हावळंकर उपस्थित होते.

महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्यानंतरही प्रकल्पाच्या कालव्यांची स्थिती अत्यंत दयनिय बनली आहे. दोन वर्षापूर्वी कालव्यांच्या कामावर दुरुस्तीच्या नावाखाली कोटय़वधीच्या निधीचा चुराडा झाला असताना देखील कालवे फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कुडासे, खानयाळे, झरेबांबर आदी विविध ठिकाणी कालव्यांना भगदाडे पडल्याने खळबळ उडाली. त्यानंतर गोव्याला सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर रविवारी कसई-दोडामार्ग शहरातून गेलेल्या डाव्या कालव्याची माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, नगरसेविका हर्षदा खरवत, शहरअध्यक्ष दादा बोर्डेकर, सुनील म्हावळंकर आदींनी प्रत्यक्ष कालव्यांची पाहणी केली. यावेळी ठिकठिकाणी कालवे फुटण्याच्या स्थितीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्वात प्रथम कालव्यांची परिस्थिती सुधारावी अन्यथा मोठी दुर्घटना होऊ शकते. यासाठी प्रकल्पअधिकाऱयांनी उपाययोजना कराव्यात. कालवाबाधित ग्रामस्थांना सोयी-सुविधा पुरवाव्यात. अन्यथा तिलारीचे गोव्याला जाणारे पाणी अडविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

गेल्यावर्षीची दुरुस्ती पाण्यात?

कसई-दोडामार्ग शहरातून गेलेल्या डाव्या कालव्याची साईबाबा मंदिर वरची धारवाडी येथे गतवर्षी दुरुस्ती करण्यात आली. मात्र, या वर्षी याचठिकाणी कालव्यांची परिस्थिती विदारक आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामांचीही चौकशी होऊन कालव्यांची परिस्थिती सुधारावी, अशी मागणी करण्यात आली.

Related posts: