|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळात महिलेची रेल्वेखाली आत्महत्या

कुडाळात महिलेची रेल्वेखाली आत्महत्या 

सहा महिन्यांच्या मुलाचे पंधरा दिवसांपूर्वीच आकस्मिक निधन

वार्ताहर / कुडाळ:

 कुडाळ-पहिली कुंभारवाडी येथे भाडय़ाने राहणाऱया सौ. दीप्ती दीपक चिंदरकर (40) यांनी रविवारी सकाळी रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह कुडाळ-एमआयडीसी रेल्वे ट्रकवर आढळला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलाचे पंधरा दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले होते. त्या मानसिक धक्क्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा परिसरात होती.

 सौ. दीप्ती यांचे घर शिरगाव-देवगड येथे असून त्या पतीसह येथील पहिली कुंभारवाडी येथील त्यांचे नातेवाईक राजन कुंभार यांच्याकडे गेल्या दहा वर्षांपासून भाडय़ाने राहायच्या. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मासे आणायला जाते, असे सांगून त्या निघाल्या. मात्र, बराच वेळ झाला, तरी त्या परत आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा बाजारात शोध घेण्यात आला. तसेच त्यांच्याकडील मोबाईल ‘स्वीच ऑफ’ मिळू लागला. त्यामुळे संशय निर्माण झाल्याने तेथील तरुणांनी रेल्वे ट्रकच्या दिशेने शोध सुरू केला. तेव्हा त्या राहत असलेल्या घरापासून साधारण अडीच-तीन किमी अंतरावर एमआयडीसी (वेंगुर्लेकरवाडी नजीक) रेल्वे ट्रकवर त्यांचा मृतदेह आढळला. त्यावरून त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

 पोलीस हवालदार पी. जी. मोरे व जे. टी. झारापकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. नंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विच्छेदनासाठी आणण्यात आला. घटनेचे वृत्त समजताच स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मानसिक धक्क्यामुळे आत्महत्या?

 चौदा वर्षांनंतर या चिंदरकर दाम्पत्याच्या कुटुंबात सहा महिन्यांपूर्वी पुत्ररत्न जन्माला आल्याने आनंदी वातावरण होते. पण नियतीने त्यांचा हा आनंद हिरावून घेतला. त्यांच्या मुलाचे पंधरा दिवसांपूर्वीच आकस्मिक निधन झाले. या कुटुंबाला तो मोठा मानसिक धक्का होता. त्या धक्क्यातून दीप्ती यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे.