|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » यमकनमर्डीच्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर धाड

यमकनमर्डीच्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर धाड 

200 गायींपैकी 47 गायी ताब्यात, 26 जणांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ संकेश्वर

यमकनमर्डी (ता. हुक्केरी) येथे छुप्या पद्धतीने चालविण्यात येणाऱया बेकायदेशीर कत्तलखान्यावर रविवारी सकाळी धाड टाकून 200 पैकी 47 गायी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या कत्तलखान्यातून दररोज 200 गायींचे मांस बेंगळूर, बिदर, गुलबर्गा, बेळगाव, विजापूरसह महाराष्ट्र व गोव्याच्या कोल्ड स्टोअरेजला पुरवठा केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

रविवारी दिल्लीच्या गो ग्यान फाऊंडेशन, गोकाकचे पोलीस आयुक्त, ग्राम विकास अधिकारी व पशु आरोग्य अधिकारी या विभागाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली आहे. यमकनमर्डीतील वॉर्ड 5 मध्ये गायी कापण्यासाठी 10 गोदामे आहेत. यापैकी चार गोदामांवर धाड टाकत 47 गायी ताब्यात घेतल्या. अन्य गोदामांवर धाड टाकण्याच्या प्रयत्नात असतानाच कत्तलखान्यातील व्यापारी आपल्या कामगारांसह धाड टाकणाऱयांवर चालून आले. त्यामुळे अधिकाऱयांनी तेथून काढता पाय घेतला. ताब्यात घेतलेल्या 47 गायी पोलीस ठाण्यात जमा केल्या. या कारवाईने गावात एकच खळबळ उडाली असून कसाईखान्याच्या कामगारांनी मोठय़ा संख्येने पोलीस स्थानकावर गर्दी केली होती. राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्नही करण्यात येत होता. पण या दबावाला न जुमानता बेकायदेशीर चालविण्यात येणाऱया कत्तलखान्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

3 वर्षापूर्वी धाड टाकली होती

यमकनमर्डीत याच ठिकाणी तीन वर्षापूवीं धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर हे कत्तलखाने बंद झाले होते. पण काही महिन्यांपूर्वी बेकायदेशीर चालणाऱया कोल्ड स्टोअरेजवर धाड टाकली. या धाडीत 550 टन गोमांस मिळाले. हे मांस म्हशींचे आहे असे पॅकेज होत होते. यावरून पुन्हा यमकनमर्डीतील कत्तलखाने उघडले, या संशयावरून रविवारी धाड टाकताच 200 गायी असलेले दहा मोठे गोदाम आढळून आले, अशी माहिती यावेळी गो ग्यान फाऊंडेशन दिल्लीचे जोशुआ अँथनी यांनी दिली.

कोटय़वधींची दररोज उलाढाल

सदर कत्तलखान्यात दिवसामागे 200 ते 300 गायी कापून त्यांचे मांस दररोज मध्यरात्रीच्यावेळी ट्रकने बेंगळूर, बिदर, गुलबर्गा, बेळगाव, विजापूरसह महाराष्ट्र व गोव्याच्या कोल्ड स्टोअरेजला पुरवठा केले जाते. या ठिकाणी मांसावर प्रक्रिया करून म्हशीचे उत्तम मांस असल्याचे लेबल लावून पॅकेज केले जाते व तेथून मांसाची विक्री स्थानिक बाजारपेठेसह बाहेरच्या देशात होत असल्याची माहिती पुढे आली आहे. या बेकायदेशीर मांस विक्रीतून दररोज कोटय़वधीची आर्थिक उलाढाल होत असल्याचे निदर्शनास आल्याचे यावेळी फाऊंडेशनच्या सूत्रांनी दिलेल्या फिर्यादीतून स्पष्ट केले आहे.

या प्रकरणातील 12 आरोपींची दुकाने महाराष्ट्र व गोव्यात आहेत. वास्तविक महाराष्ट्रात गोमांसाला विरोध असताना महाराष्ट्रात दररोज मोठय़ा प्रमाणात होणारी मांस वाहतूक होतेच कशी? असा प्रश्न उपस्थित होण्यासह बडय़ा धेंडय़ासह पोलिसांचाही यात हात आहे का? असा संशय घटनास्थळी चाललेल्या चर्चेतून व्यक्त केला जात होता.

कत्तलखाने नष्ट करणार

एवढय़ा मोठय़ा प्रमाणात चालवण्यात येणारे कत्तलखाने मी पहिल्यांदाच पाहिले आहेत. गायी मारण्यास कायदेशीर बंदी असतानाही बेकायदेशीर चाललेला हा छुपा उद्योग यापुढे या भागात चालणार नाही. यावर काटेकोरपणे निर्बंध घालून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती गोकाकचे पोलीस उपायुक्त प्रभू डी. टी. यांनी दिली.

या घटनेचा रात्री 8.30 वाजता पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलेल्या गायी सरकारी गोशाळेत पाठविण्यात आल्या. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी करीत असून आरोपींना पोलिसांनी अटक करण्याच्यादृष्टीने प्रयत्न चालविला असल्याची माहिती आहे.

Related posts: